Type Here to Get Search Results !

अनैतिक संबंध आणि पैशांचा गुंता : पत्नीने प्रियकरासोबत रचला खूनाचा कट!

चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर हत्याकांडात धक्कादायक खुलासा

पत्नी चैताली आणि प्रियकर सिद्धार्थ पवार पोलिस कोठडीत

पुणे / प्रतिनिधी :- चिंचवड परिसरातील समाजसेवक नकुल भोईर यांच्या हत्येचे रहस्य आता पूर्णपणे उलगडले असून या प्रकरणात पत्नीच आरोपी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आधी पतीच्या चारित्र्यावर शंका घेत पत्नीने हत्या केली, असे सांगितले जात होते. पण तपास जसजसा पुढे गेला तसतसा या हत्येमागील खरा हेतू समोर आला, अनैतिक संबंध आणि आर्थिक वाद! 


* पत्नीचे परपुरुषाशी संबंध अन् पती आड येत होता :- नकुल भोईर (वय 32) यांच्या पत्नी चैताली भोईर (वय 28) हिचे सिद्धार्थ दीपक पवार (वय 30) या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नकुल यांनी पत्नीच्या या वागणुकीला विरोध करणे, तिला मद्यपान करण्यास आणि विशिष्ट मैत्रिणींसोबत फिरण्यास रोखणे, हे चैतालीला खटकत होते. या सर्वांचा राग मनात धरत चैतालीने प्रियकर सिद्धार्थसोबत मिळून पतीची हत्या करण्याचे नियोजन केले.


* कपड्याने गळा आवळून हत्या :- 24 ऑक्टोबरच्या पहाटे दोघांनी मिळून नकुल भोईर यांचा कपड्याने गळा आवळून खून केला. घटनास्थळावरून पळून गेले असले तरी पोलिसांनी काही तासांत दोघांचा शोध लावला.


* पोलिस तपासात उघड ; कर्जाचाही मुद्दा :- फक्त अनैतिक संबंधच नव्हे तर पैशांच्या वादामुळेही चैताली अस्वस्थ होती, असे समजते. नकुलने काही कर्जे घेतली होती आणि आर्थिक ताणामुळे घरात वाद होत होते. या सर्व ताणतणावातून चैतालीने पतीच्या जीवावर उठण्याचा निर्णय घेतला.


* दोघेही कोठडीत :- चैताली आणि सिद्धार्थला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांना 1 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


* दोन निष्पाप मुलांचे भविष्य अंधारात :- या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन मुले आहेत. आई-वडिलांचा संसार गेला, वडील मृत आणि आई कोठडीत, या निष्पाप बालकांचे भविष्य कोण पाहणार ? याची कळ सर्वांनाच लागली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


* समाजकार्य करणारा कार्यकर्ता, पत्नीला राजकारणात आणण्याची तयारी :- नकुल भोईर हे चिंचवड परिसरातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी चैतालीला राजकारणात आणण्याचीही तयारी केली होती. पण त्यांच्याच हातून त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला, हे अधिकच करूण वास्तव आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement