Type Here to Get Search Results !

नगरदेवळा ग्रामपंचायतीत स्वच्छतेचा बोजवारा!

* महिलांना ‘असुविधा’ नाही तर ‘अपमान’ मिळतोय!

* ग्रामपंचायतीच्या डोळ्यासमोर घाण, दुर्गंधी आणि पाण्याचे डबके

* स्वच्छ भारत अभियानाच्या कोट्यवधी निधीचे नेमके होतंय काय ? महिलांच्या सन्मानावर डाग !

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- “स्वच्छ भारत अभियान” - नाव मोठे, पण काम शून्य... नगरदेवळा गावातील वास्तव पाहिले तर असे म्हणावे लागेल की हा “स्वच्छ भारत” नव्हे तर “दुर्गंध भारत” आहे. गावातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था इतकी भीषण झाली आहे की, महिलांना शौचालय वापरणे म्हणजे अपमानाचा आणि आजाराचा प्रवास बनला आहे. शौचालय परिसरात पाणी साचलेले, जागोजागी घाण, दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव, या सगळ्या अस्वच्छ वातावरणात महिलांना रोजच्या गरजा भागवाव्या लागतात आणि ग्रामपंचायत प्रशासन मात्र डोळे मिटून बसलंय.

आज ग्रामपंचायतील वॉर्ड क्रमांक तीन मधील परिस्थिती अतिशय विदारक आहे. महिलांना सार्वजनिक शौचालय जाण्याच्या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत तसेच शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे, त्यामुळे शौचालयाला जाता येत नसल्याने या भागातील भोई गल्ली, भावसार गल्ली व मुस्लिम मोहल्यातील महिलांनी 'एल्गार' पुकारला. ग्राम पंचायत सदस्य व प्रशासनाला महिलांनी चांगलेच धारेवर धरले. मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी ग्राम पंचायत प्रशासनाची असतांना स्वच्छ शौचालय देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने जाब विचारण्यात आला, याप्रसंगी महिला भगिनी चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या.


* महिलांना त्रास, अधिकारी मात्र गप्प :- गावातील वॉर्ड क्रमांक 3 मधील स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. त्या वॉर्डातील दोन्ही सदस्य प्रत्यक्ष उपस्थित असूनही पाच वर्षांपासून शौचालयाच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांसाठी नेमके काय विकासकाम झाले ? हा प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारतोय. शौचालयात पाऊल टाकणे अशक्य झालंय, तिथं पाणी साचलेलं, नाल्या तुंबलेल्या आणि दुर्गंधीचा थरारक अनुभव दररोज मिळतोय. या अस्वच्छतेमुळे महिलांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत चालला आहे, पण संबंधित अधिकारी मात्र गप्प!


* स्वच्छ भारत अभियानाचा निधी कुठे गेला ? :- केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला 'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. तो निधी शौचालय उभारणी, देखभाल आणि स्वच्छतेसाठीच असतो. मग प्रश्न असा की, नगरदेवळा ग्रामपंचायतीला हा निधी मिळाला नाही का ? मिळाला असेल तर तो गेला कुठे ? निधी मिळाला, पण वापर झाला नाही का ? आणि खर्च झाला असेल तर परिणामी गावकऱ्यांना “कागदावरचा विकास” आणि “प्रत्यक्षात दुर्गंधी” हेच मिळाले का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


* महिलांचा सन्मान घोषणांत, वास्तवात तिरस्कार :- शौचालयांपर्यंत पोहोचण्यासाठी महिलांना घाणीतून वाट काढावी लागते, पायांखाली साचलेले पाणी, डास, दुर्गंधी, ही परिस्थिती 2025 मध्येही कायम आहे. “बेटी बचाओ, बेटी पढाओ”चा नारा देणारे नेते आज “बेटी शौचालयातही जाऊ शकत नाही” अशी परिस्थिती निर्माण करीत आहेत, हे ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण आहे.


* गावकरी गप्प का ? मौन म्हणजे मान्यता का ? :- गावकऱ्यांना ही दुर्दशा माहीत आहे, पण कुणी आवाज उठवत नाही. महिलांना रोज त्रास, पण पुरुष, कार्यकर्ते आणि नेते मौन धारण करून बसलेत. आपल्या आई-बहिणींसाठी आवाज उठवला नाही, तर ही लोकशाही नव्हे तर मोगलशाहीच आहे.


* आता नाही बोललो, तर कायम गप्प रहावे लागेल :- ग्रामस्थांनी ठाम मागणी केली आहे की, ग्रामपंचायतीने तातडीने शौचालय वापरण्यायोग्य करावे. साचलेले पाणी व घाण साफ करून निर्जंतुकीकरण करावे. स्वच्छ भारत निधीचा हिशोब सार्वजनिक करावा. महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि स्वच्छ शौचालयांची निर्मिती करावी.


* वॉर्ड क्रमांक 3 मधील वस्तुस्थिती - विकास की विनाश ? :- गावातील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये आज स्थिती अशी आहे की, महिलांना उघड्यावर शौचाला जावे लागतंय. शौचालयात ना साफसफाई, ना पाणी, ना प्रकाश, हाच का ग्रामपंचायतीचा “विकास”? नागरिकांनी आता ठरवले पाहिजे, विकास हवा, की फोटो काढणारे लोकप्रतिनिधी ? आधी सुविधा द्या आणि मगच मतदान माघायला या, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.



Top Post Ad

Below Post Ad

Advertisement