Type Here to Get Search Results !

साताऱ्यातील महिला डॉंक्टर आत्महत्येची धग

* पंकजा मुंडे यांना गृहमंत्री करा, सुषमा अंधारेंना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या - सचिन खरातांची मागणी

सातारा / प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील तरुण महिला डॉंक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी पीडित कुटुंबाला भेट देत सरकारकडे कठोर निर्णयांची मागणी केली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना पूर्णवेळ गृहमंत्रीपद द्यावे व सुषमा अंधारेंना महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावर नियुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


खरात पुढे म्हणाले की, राज्याला सध्या पूर्णवेळ गृहमंत्री नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला नेतृत्व आवश्यक आहे. पंकजा मुंडे यांना गृहमंत्री करा. तर या प्रकरणात ठाम आवाज उठविणाऱ्या सुषमा अंधारेंना महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावर नियुक्ती द्यावी.


* गुन्हा बीडमध्ये चालवा, नार्को टेस्टची मागणी :- खरात यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणातील गुन्हा बीडमध्ये चालवावा आणि ज्यांची नावे समोर आली आहेत त्यांची नार्को टेस्ट करावी. तसेच त्यांनी थेट भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना लक्ष्य करीत म्हटले की, मोठमोठ्या घोषणा करणारे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप या प्रकरणात मोर्चा का काढत नाहीत ?


फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉंक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने हातावर लिहून ठेवले आहे की, माझ्या मरण्याला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने जबाबदार आहे. त्याने चार वेळा अत्याचार केला. तसेच प्रशांत बनकरने चार महिने मानसिक व शारीरिक छळ केला.


या प्रकरणी फलटण पोलिसांनी दोन्ही आरोपींवर लैंगिक अत्याचार व छळाचे गुन्हे नोंदविले आहेत. पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून दोन्ही आरोपींना अटक झाली आहे. या प्रकरणाने राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून सरकारवर कठोर कारवाई आणि संवेदनशील तपासाची मागणी केली जात आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement