Type Here to Get Search Results !

"रन फॉर युनिटी" उपक्रमात खोपोलीकरांचा उत्स्फूर्त सहभाग

* राष्ट्रीय एकता दिनानिमित्त खोपोली पोलिस ठाण्याच्या पुढाकाराने आयोजित एकता दौड

खोपोली / प्रतिनिधी :-  राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर 2025 रोजी “रन फॉर युनिटी - अर्थात एकता दौड” या उपक्रमाचे आयोजन खोपोली पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमाचा आरंभ खोपोली पोलिस ठाणे येथून झाला. शहरातील विविध भागांतून एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी ठिकठिकाणी दौडचे स्वागत करून सर्वांचा उत्साह अधिकच वृद्धिंगत केला. अखेरीस या दौडची पोलिस ठाण्याच्या आवारात सांगता झाली.


याप्रसंगी खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहुल यांनी दौडमध्ये सहभागींचे झालेल्यांचे मनःपूर्वक आभार मानत कौतुक केले. त्यांनी राष्ट्रीय एकतेचे महत्त्व अधोरेखित करीत समाजातील सर्व घटकांनी परस्पर सलोखा आणि बंधुतेचा संदेश जनमानसात पोहोचवावा, असे आवाहन केले.


या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट व शूज असा ड्रेसकोड परिधान केला होता. कार्यक्रमात उत्साही खोपोलीकर नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, करिअर कोचिंग क्लासचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, हेल्प फाउंडेशन, पोलिस मित्र संघटना आणि पत्रकार बांधव यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खोपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या पुढाकाराने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पडला. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत समाजात एकतेचा संदेश दिला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement