* उच्च न्यायालयाचा निर्विवाद निकाल
* पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा मार्ग मोकळा
* एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची याचिका फेटाळली
* शिवराय हे सार्वत्रिक प्रेरणास्रोत - नावावर खासगी मालकीचा दावा ग्राह्य नाही : न्यायालय
मुंबई / प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कोणाचाही विशेषाधिकार नाही, असे स्पष्ट निरीक्षण करीत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील देत एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपीची याचिका फेटाळण्यात आली.
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या 2009 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या निर्मात्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने कॉपीराइट व स्वामित्त्व हक्क उल्लंघनाचा आरोप करीत नवीन चित्रपटाला स्थगितीची मागणी केली होती. परंतु न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने कंपनीचे दावे निराधार आणि असमर्थनीय ठरवले.
* न्यायालयाचे निरीक्षण :- छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण समाजाचे प्रेरणास्थान, त्यांच्या नावावर खासगी मालकी सांगता येत नाही. दोन्ही चित्रपटांच्या पटकथेत साम्याचे आधार अपुरे, संवादांची कथित नक्कल - दावा अवास्तव, शीर्षकामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता नाही, मराठी प्रेक्षक सुजाण आणि परिपक्व आहेत, यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवारी नियोजित वेळेनुसार होणार आहे.
2013 मध्ये मांजरेकर यांनी त्यांचा हिस्सा कंपनीला हस्तांतरित केला. त्यामुळे एव्हरेस्टने मूळ चित्रपटावर पूर्ण हक्क असल्याचा दावा न्यायालयात केला होता. परंतु प्रीक्वेल / सिक्वेल हक्काचा आधार देखील न्यायालयाने नाकारला.
या निर्णयामुळे सांस्कृतिक दाव्यांचा अतिरेक रोखण्याचा नवा संदर्भ निर्माण झाला असून छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जनतेचे दैवत आहेत हा सिद्धांत पुन्हा अधोरेखित झाला आहे.


Social Plugin