Type Here to Get Search Results !

मला आई बनवा, 25 लाख मिळवा !

* जाहिरातीच्या आमिषात पुण्याच्या कंत्राटदाराची 11 लाखांची फसवणूक

* सोशल मीडियावर ‘प्रेग्नंट जॉब’चा गंडा : नोंदणी, टेस्ट, व्हेरिफिकेशन नावाखाली पैसे घेत ठग गायब 

पुणे / प्रतिनिधी :- सायबर गुन्हेगारांनी आता आणखी एक विचित्र आणि धक्कादायक फसवणूक प्रकार रचला आहे. एका महिलेला गर्भवती करा आणि 25 लाख रुपये मिळवा, अशा नावाच्या बनावट जाहिरातीत फसत पुण्यातील एका कंत्राटदाराने तब्बल 11 लाख रुपये गमावले आहेत. ही घटना बाणेर परिसरात घडली असून, पीडित कंत्राटदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या बाणेर पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


* जाहिरात पाहून ‘सुखाने पडलो, दु:खाने उठलो' :- तक्रारीनुसार सप्टेंबरच्या सुरुवातीला पीडिताला मोबाईलवर एक व्हिडिओ पाठविण्यात आला, ज्यात एक महिला म्हणताना दिसत होती. मला आई बनवायचं आहे…पैसा देईन, जात–धर्म महत्त्वाचा नाही. त्यासोबतच ‘प्रेग्नंट जॉब’ असे लिहिलेल्या जाहिरातीचा फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर संपर्क साधताच एका व्यक्तीने स्वतःला ‘प्रेग्नंट जॉब फर्मचा असिस्टंट’ म्हणून ओळख करून दिली आणि ही “कायदेशीर प्रक्रिया” असल्याचे सांगितले.


* रजिस्ट्रेशन, आयडी, जीएसटी - असे सुरु झाले पैसे उकळणे :- ठगांनी पीडिताला सांगितले की, रजिस्ट्रेशन फी, ओळखपत्र, व्हेरिफिकेशन, मेडिकल TEST, GST, सेक्युरिटी डिपॉझिट या नावाखाली पैसे भरावे लागतील. विश्वास बसलेल्या कंत्राटदाराने 7 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर 2025 दरम्यान वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये 11 लाख रुपये ट्रान्सफर केले.



* प्रश्न विचारताच फोन BLOCK :- काही दिवसांनी पीडिताने संशय घेतला आणि चौकशी सुरु केली. त्यावर ठगांनी धमकी दिली आणि नंतर पूर्णपणे संपर्क तोडत नंबर BLOCK केला. त्यानंतर त्याला फसवणुकीची जाणीव झाली आणि तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.


* देशभरात ‘प्रेग्नंट जॉब’चे जाळे :- सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत देशभरात अशा प्रकारचे अनेक गुन्हे समोर आले आहेत. फसवणूक करणारे बनावट व्हिडिओ, खोट्या जाहिराती, फेक सोशल मीडिया पेजेस वापरून अशा वासनाधारित आमिषांद्वारे पुरुषांना जाळ्यात ओढत आहेत. काही प्रकरणांत आरोपी बिहार, उत्तर प्रदेश व इतर राज्यांतून अटक झाले आहेत. हे एक मोठे सायबर क्राईम नेटवर्क असल्याचे तपासात समोर आले आहे.


* पोलिसांचा इशारा :- पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,  अशा भलत्या–सलत्या ऑफर्सवर विश्वास ठेऊ नका...अनोळखी नंबर/व्हिडिओ/जाहिरातींना प्रतिसाद देऊ नका...कोणत्याही प्रकारचे पैसे ट्रान्सफर करण्याआधी पडताळणी करा..सायबर गुन्हे त्वरित 1930 वर कळवा.


* सावधान! लोभामध्ये फसवणूक - सायबर गुन्हेगारांचे नवे आमिष :- अशा प्रकारच्या जाहिराती केवळ व्यक्तीचा लोभ आणि वैयक्तिक दुर्बलता लक्षात घेऊन तयार केल्या जातात. ही घटना पुन्हा एकदा दाखवते की, पैशाच्या लालसीत घेतलेलं पाऊल संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement