* सोलापूरचा विजय लमकणे राज्यात प्रथम
* नागपूरची प्रगती जगताप एससी प्रवर्गातून अव्वल;
* इतिहासातील सर्वाधिक कट-ऑफमुळे उमेदवारांमध्ये चर्चेला उधाण
पुणे / प्रतिनिधी :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल अखेर जाहीर झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या या निकालात सोलापूरचा विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, हिमालय घोरपडे यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तर नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात अव्वल स्थान पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
एमपीएससीनुसार यंदा 7,970 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले, त्यापैकी 7,732 उमेदवारांनी अर्ज सादर केला. तांत्रिक अडचणींमुळे अर्ज न करता आलेल्या पात्र उमेदवारांना आयोगाने अतिरिक्त संधी दिली होती. एमपीएससीने जाहीर केलेला निकाल हा आरक्षण, समांतर आरक्षण आणि न्यायालयीन प्रकरणांच्या निकालाच्या अधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्य परीक्षेत अपात्र ठरलेल्यांनी उत्तरपत्रिकेच्या गुणांची फेरपडताळणी 10 दिवसांत ऑनलाईन अर्जाद्वारे करावी असा सल्ला आयोगाने दिला आहे.
राज्यात प्रथम क्रमांक पटकाविणारे विजय लमकणे हे पूर्वीही एमपीएससीद्वारे सेवेत निवड झालेले असून गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सातत्यपूर्ण मेहनत, लक्ष्याची जाण आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्यांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. एससी (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या प्रगती जगताप हिने ही आपल्या संयम, सातत्य आणि शैक्षणिक तयारीमुळे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


Social Plugin