* हितेश अनिल पाटील यांना राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक ; आता उजबेकिस्तानमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
पाचोरा / विशेष प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यातील गाळण (खु.) या छोट्याशा गावाने पुन्हा एकदा राज्य आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. गावातील सुपुत्र पहेलवान हितेश अनिल पाटील यांनी कर्नाटकातील बेळगाव येथे आयोजित मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 125 किलो (ओपन) गटात सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचा मान उंचावला.
या तेजस्वी कामगिरीमुळे हितेश यांची भारताच्या राष्ट्रीय संघात निवड झाली असून, येत्या नोव्हेंबर 2025 मध्ये उजबेकिस्तानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ते देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
* शेतकरी कुटुंबातून राष्ट्रीय मंचापर्यंतचा प्रवास :- साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या हितेश यांच्या मेहनत, जिद्द आणि शिस्तीने त्यांना राष्ट्रीय मैदानापर्यंत पोहोचवले. त्यांच्या घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी सातत्याने साथ दिल्याने त्यांनी आपली स्वप्ने साकार केली. हितेश हे माजी पंचायत समिती सभापती ललिता अनिल पाटील, माजी सरपंच व संचालक अनिल धना पाटील यांचे सुपुत्र आहेत. घरातील सामाजिक मूल्ये आणि प्रेरणा यामुळे हितेश यांची वाटचाल अधिक बळकट झाली.
* शिस्त, कष्ट आणि ध्येय - यशाचा पाया :- हितेश यांनी ध्येय करिअर अकॅडमी, पाचोरा येथे शिक्षण घेतले. सकाळी सूर्योदयापूर्वी सराव, संतुलित आहार, कडक शिस्त आणि अथक मेहनत या त्रिसूत्रीने हितेश यांनी स्वतःला घडवले. राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी दमदार खेळ करीत अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्याला अल्पावधीतच चितपट करत सुवर्णपदक जिंकले.
* कुस्ती दिग्गजांकडून गौरव :- हितेश यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे राज्यभरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी त्यांचा प्रत्यक्ष भेट घेऊन सन्मान केला. नामवंत पहलवान सिकंदर शेख यांनी त्यांचे अभिनंदन करून उभारी दिली आणि त्यांच्या जिद्दीचे सर्व स्तरांवरून कौतुक झाले.
* गावात आनंदौत्सव - अभिमानाचे वातावरण :- विजयाची बातमी समजताच संपूर्ण गाळण गावात जल्लोष केला गेला. फटाके फोडून, मिठाई वाटून गावकऱ्यांनी अभिमान साजरा केला. ग्रामपंचायतीसह स्थानिक संस्था व क्रीडा मंडळांनी हितेश यांच्या सत्काराची जोरदार तयारी केली आहे.
कुस्ती माझी ओळख आहे. प्रत्येक घामाच्या थेंबाने मी हे स्वप्न उभे केले आहे. माझ्या पालकांचे आणि प्रशिक्षकांचे कृतज्ञ आहे. आता माझे ध्येय उजबेकिस्तानमध्ये भारताचा तिरंगा फडकविणे आहे. त्यांच्या आत्मविश्वासाने युवकांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.
* गाळण गावाची नवी ओळख - प्रेरणेचा स्रोत :- हितेश यांच्या या कामगिरीमुळे गाळण गावाला नवी ओळख मिळाली आहे. गावातील युवकांसाठी हितेश आदर्श ठरत असून ग्रामीण भागातील खेळाडूही योग्य प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि मेहनतीने जागतिक पातळीवर यश मिळवू शकतात याचा सुंदर आदर्श त्यांनी साकारला आहे.
* पुढील लक्ष्य - आंतरराष्ट्रीय सुवर्ण :- उजबेकिस्तानमध्ये भारतासाठी सुवर्णयश मिळविण्याच्या ध्येयाने हितेश सध्या तीव्र सराव करीत आहेत. संपूर्ण पाचोरा तालुका आणि जळगाव जिल्हा त्यांच्या या मोहिमेत त्यांच्यासोबत उभा आहे.


Social Plugin