Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेना व भाजपला साद !

* आ. किशोर आप्पा पाटील, आ. मंगेश चव्हाण यांची अजित पवार गट‌‌‌ भेट घेणार 

* महायुतीतून लढण्याचा निर्धार : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती जाहीर

* इच्छुक उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

* भडगाव शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भव्य पत्रकार परिषद

भडगाव / फिरोज पिंजारी :- भडगाव शासकीय विश्रामगृह येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीत भडगांव व पाचोरा तालुक्यातील पदाधिकारी यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी पक्षाची भुमिका आणि रणनीती जाहीर करीत युतीसाठी शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टी या विधानसभा क्षेत्रातील दोन कट्टर विरोधकांना साद घातली. 


याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे, प्रभारी तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, तालुकाध्यक्ष अनिल पाटील, शहराध्यक्ष रवींद्र महाजन तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.


* आप्पांनी शब्द पाळावा - अभिलाषा रोकडे :- याप्रसंगी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तनामनाने काम केले होते. त्यावेळी किशोर आप्पांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये सहकार्य करण्याचा शब्द दिला होता, तरी आ. किशोर आप्पा पाटील यांनी शब्द पाळावा, असे आवाहन केले.


* महायुतीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय :- पत्रकार परिषदेत बोलतांना माजी तालुकाध्यक्ष हर्षल पाटील यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पक्षांसोबत युती करून लढू इच्छुक आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार किशोर आप्पा पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे पालक नेते आमदार मंगेश चव्हाण व भाजप नेते माजी आमदार दिलीप वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोल शिंदे यांच्याशी भेटून युतीत निवडणूक लढण्याबाबत चर्चा करणार आहेत. 


दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती व पाचोरा - भडगांव नगर परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी 4 नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले. 


* सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जावू :- यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीवर आधारित आहे. सर्व अठरा पगड समाजांना सोबत घेऊन, विकास व सामाजिक न्यायाच्या बळावर आम्ही पुढे जावू. त्यांनी अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष भक्कम असल्याचे सांगत जिल्हा नेते माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रणनिती आखण्यात येत असल्याची माहिती दिली.


* सन्माननीय जागांचा अपेक्षित वाटा :- पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सन्मानाने जागा मिळाव्यात, अन्यथा स्वतंत्र मैदानात उतरण्याचाही पर्याय खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


* उमेदवारांचा वाढता प्रतिसाद :- दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर अनेक इच्छुकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली. पक्षाने सर्वांना निर्धारित वेळेत अर्ज सादर करण्याचे सांगितले.


* सामाजिक व विकासाभिमुख ध्येय :- सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ सत्तेसाठी नाही तर सामाजिक सलोखा, विकास आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारा पक्ष आहे. मतदार निश्चितच आमच्या पुरोगामी विचारांना साथ देतील, असा विश्वास व्यक्त केला.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement