* ही फक्त वन्य जीवांची कहाणी नाही… ही आहे नैसर्गिक प्रेम, धाडस आणि संवर्धनाची गाथा!
मुंबई / प्रतिनिधी :- प्रेमासाठी माणूस कितीही टोकाचे निर्णय घेतो, कथा-कवितांमध्ये प्रेमासाठी डोंगर हलवले जातात, नदी पार केल्या जातात…पण हेच प्रेम जर एका वाघाच्या हृदयातही जळू लागलं तर ? होय! अशीच एक अद्भुत व रोमँटिक घटना घडलीय. महाराष्ट्रातील एक तरुण वाघ प्रेमाच्या शोधात थेट राज्यसीमा ओलांडत तेलंगणात पोहोचला.
वन्यजीवांच्या जगातील ही प्रेमकहाणी फक्त मनोरंजन नाही, तर निसर्गातील भावविश्वाची स्पंदनं अनुभवणारी आहे. वाघांच्या प्रजनन हंगामाची चाहूल लागताच या नर वाघाच्या मनात प्रेमाची हाक जागी झाली. आपल्या जोडीदाराचा आवाज, जंगलातील सुगंध, आणि प्रेमाची ओढ… या सारे खेचणाऱ्या शक्तीमुळे त्याने धाडसी प्रवासाला सुरुवात केली.
या वीर वाघाने 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास करीत नद्या पार केल्या, दाट अरण्यांमधून वाट काढली, वन्य जीवांच्या हाकांमध्ये आपल्या प्रेमाची चाहूल शोधली. वनविभागाच्या ट्रॅकिंग यंत्रणेमुळे त्याच्या या रोमँटिक मोहिमेचे जग साक्षी ठरले. अखेर हा धाडसी नायक तेलंगणातील मंचेरियल जंगलात पोहोचला आपल्या ‘तिला’ शोधण्यासाठी!
फक्त मानवच प्रेमात वेडे होतात, असे कोण म्हणते ? या वाघाने सिद्ध केले की प्रेम हे सीमा ओलांडते…मग ती राज्याची असो की जंगलाची! वनविभागातील अधिकारी सुद्धा या साहसी प्रेमयात्रीचे कौतुक करुत आहेत. कारण हा प्रवास समृद्ध जंगलसाखळी, सुरक्षित मार्ग आणि वनसंवर्धन यांच्या यशाचेही प्रतीक आहे.
प्रेमासाठी जीव झटतोच…मग तो मानव असो किंवा जंगलाचा राजा वाघ. निसर्गातील या अदृश्य प्रेमकथेची जादू अशीच मनाला हुरहूर लावणारी…वाघाचे प्रेमही इतके निष्ठावान आणि धाडसी असू शकते, याची सुंदर साक्ष आहे.


Social Plugin