Type Here to Get Search Results !

खालापूर तालुक्याचे सुपुत्र सुधाकर बुवा पाटील यांचा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव


* आमदार संजय केलकर यांच्या हस्ते सन्मान - साहित्य, सांस्कृतिक योगदान व समाजजागृती कार्याची दखल

खालापूर / सुधीर माने :- खालापूर तालुक्यातील जांबरूग (जामरूंग) गावचे सुपुत्र सुधाकर बुवा देऊ पाटील यांनी आपल्या बहुमुखी कला आणि सामाजिक कार्याच्या जोरावर राज्य पातळीवर मानाचा ठसा उमटविला आहे. त्यांना मराठी साहित्य मंडळाकडून समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.


यावेळी व्यासपीठावर मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहित्यिक डॉं. जयप्रकाश घुमटकर, कवयित्री लीना वाघमारे, निवेदिका रेखा काळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे सुधाकर बुवा पाटील यांचे कर्जत - खालापूर तालुका तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


* बालपणापासून कलावैभवाची जादू :- सुधाकर बुवा यांना लहानपणापासूनच कलाविष्काराची आवड आहे. खालापूर व कर्जत परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांनी नारद मुनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक पोवाडे, विविध वेशभूषांतील भूमिका उत्कृष्टरीत्या सादर केल्या. त्यांच्या वेशभूषा, अभिनय आणि सादरीकरण यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून बसले. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.


* समाजजागृतीसाठी भारुड व गायनाचे माध्यम :- सुधाकर बुवा यांनी भारुड, भजने, गायन आणि स्वतः लिहिलेल्या रचनांद्वारे समाजप्रबोधनाचे काम केले आहे. त्यांचे गायन व भारुड हे केवळ मनोरंजन नसून, समाजाला दिशा देणारे संकल्पनात्मक संदेश देणारे ठरले आहेत. त्यांनी समाजभान जागवले, संस्कृतीचा वारसा जपला लोकजागृतीला गती दिली. त्यांच्या या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.


* स्थानिक ते राज्य पातळीचा गौरव :- खेड्यापाड्यातील कलाप्रेमातून सुरू झालेला हा प्रवास, आता राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत पोहोचला आहे. हा सन्मान केवळ सुधाकर बुवा यांचा नव्हे तर खालापूर - कर्जत तालुका आणि पूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान आहे.


* सुधाकर बुवा यांना अभिमानपूर्वक सलाम :- त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेऊन दिलेल्या या पुरस्काराने त्यांचे आयुष्यभराचे योगदान उजळून निघाले आहे. स्थानिक नागरिक, मित्र परिवार, सामाजिक संघटना, सांस्कृतिक कार्यकर्ते यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement