* पाचोरा शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवदृष्टी
* पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचे आश्वासन
पाचोरा / प्रतिनिधी :- पाचोरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा ठोस व आश्वासक संकल्पनामा जाहीर केला आहे. या संकल्पनाम्यात नागरिकांच्या मूलभूत गरजा, युवकांसाठी रोजगारनिर्मिती तसेच पारदर्शक प्रशासनाचे उद्दिष्ट मांडण्यात आले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली एआयएमआयएम पक्षाने पाचोरा शहरात लोकाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
जिल्हा निरीक्षक शारिक नक्शबंदी, जिल्हा उपाध्यक्ष फहिम शेख, तालुकाध्यक्ष डॉं. अखिल शेख, शहराध्यक्ष ताहेर अली सय्यद तसेच अशपाक खाटीक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष पदासह 10 नगरसेवक जागांवर एआयएमआयएमने उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
* पक्षाच्या संकल्पनाम्यातील प्रमुख मुद्दे :- नागरिकांसाठी दर्जेदार पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था, सर्व समाजघटकांचा समान विकास व न्याय्य प्रतिनिधित्व, युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी...रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांवर विशेष भर, भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासनाची हमी.
एआयएमआयएमचे जिल्हा उपाध्यक्ष फहिम शेख म्हणाले की, एआयएमआयएम ही केवळ राजकीय पक्षसंस्था नाही, तर शहरातील प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारी चळवळ आहे. आम्ही जनतेच्या आशिर्वादाने पाचोराच्या प्रगतीसाठी प्रामाणिक, संघर्षशील आणि जबाबदार भूमिका घेऊ.
एआयएमआयएम पक्षाच्या या ठोस व जनहितैषी संकल्पनाम्यामुळे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाच्या संघटनेची वाढती ताकद आणि शहरातील युवक वर्गाचा प्रतिसाद पाहता, पाचोराच्या राजकारणात एआयएमआयएम एक प्रभावी पर्याय ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Post a Comment
0 Comments