Type Here to Get Search Results !

चंद्रपूरात पुन्हा वाघाचा हल्ला!

* सिंदी तोडण्यासाठी गेलेला शेतकरी ठार

* जवराबोडी - मेंढा जंगलातील थरारक घटना

* शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी सापडले

चंद्रपूर / प्रतिनिधी :- ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी लगतच्या जवराबोडी - मेंढा जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. सिंदी तोडण्यासाठी गेलेला शेतकरी भास्कर गोविंदा गजभिये (वय 62, रा. मेंडकी) याच्यावर वाघाने क्रुरपणे हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


भास्कर गजभिये हे अल्पभूधारक शेतकरी असून रविवारी सकाळी ते आपल्या शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी सिंदी तोडण्यासाठी जवराबोडी - मेंढा जंगलात गेले होते. रात्रीपर्यंत ते घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. आज सोमवारी सकाळी शोध घेत असताना, गावकऱ्यांना जंगलात त्यांची सायकल व सिंदी आढळून आली. पुढे काही अंतरावर अत्यंत भयानक दृश्य दिसले. भास्कर गजभिये यांचे शरीराचे अवयव विखुरलेल्या अवस्थेत सापडले. ही माहिती मिळताच मेंडकी ग्रामस्थ, वनविभाग व पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. शरीराचे अवयव गोळा करून पंचनामा करण्यात आला व मृतदेह ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.


वर्ष 2025 मध्येच चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 39 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 35 जणांचा बळी वाघाने, 2 बिबट्याने, 1 अस्वलाने, तर 1 नागरिकाचा मृत्यू हत्तीच्या हल्ल्यात झाला आहे. शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण असून शेती करायची कशी ? असा सवाल शेतकरी वर्गांतून उपस्थित होत आहे.


गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वाघाचे वारंवार दर्शन होत होते, तसेच जनावरे ठार केल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. तरी देखील वनविभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्याच परिणामी आज गजभिये यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


भास्कर गजभिये यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीचा अपघातात मृत्यू झाला होता, तर वर्षभरापूर्वी एका मुलाचेही निधन झाले होते. आता घरातील एकमेव कमावता हात गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


घटनेनंतर मेंडकी व जवराबोडी - मेंढा परिसरात नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, जंगलात नियमित गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक नेमावे अशा मागण्या केल्या आहेत.


ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत, वारंवार वाघाच्या दहशतीत नागरिकांचे जीव जात असताना प्रशासन डोळेझाक करीत आहे, असा आरोप केला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement