* लोककला संवर्धनासाठी मोलाचे योगदान ; शाहीर देवानंद माळी यांची अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड
जळगाव / प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांच्या जतन - संवर्धनासाठी आयुष्यभर कार्यरत राहून सुमारे 450 हून अधिक लोककलावंतांना एकत्र आणत कलाविकासाची उज्ज्वल दिशा देणारे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे संस्थापक व मुख्य विश्वस्त राष्ट्रशाहीर रमेश कदम यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान, जळगाव यांच्या वतीने प्रदान करण्यात आला. त्यांच्या लोककला विकासातील दीर्घ, प्रभावी आणि प्रेरणादायी योगदानाची दखल घेत संस्थेच्या वतीने हा पहिला जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
* लोककलेच्या संवर्धनाचे प्रेरणास्थान :- कार्यक्रमात राज्यातील विविध लोककलाप्रकारांतील कलाकारांनी सहभाग घेतला. गोंधळ, तमाशा, बहिरंग नाट्य, वाघ्या - मुरली, भारुड आदी पारंपरिक कला सादर करण्यात आल्या. या प्रसंगी रमेश कदम यांनी लोककलावंतांच्या सामाजिक - आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
* शाहीर देवानंद माळी यांना मोठी जबाबदारी :- या सोहळ्यात प्रसिद्ध ज्येष्ठ शाहीर सम्राट देवानंद माळी यांची अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. या निर्णयाचे शाहीर विश्वात स्वागत होत असून शाहीर समाजात उत्साहाचे वातावरण आहे.
* दिमाखदार सन्मान सोहळा :- सन्मान सोहळ्यात सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध शाहीर मंडळांचे पदाधिकारी, लोककलावंत व प्रशंसक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषेत झालेल्या या सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष दिमाख मिळाला.
वाल्मिकी वही गायन मंडळ, जळगाव संतोष चौधरी आणि सहकारी या मंडळाच्या वतीने राष्ट्रशाहीर रमेश कदम व शाहीर सम्राट देवानंद माळी यांना मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.


Social Plugin