* खेळाडूंसाठी राज्यात अधिक सुविधा व निधी - क्रीडा संस्कृती बळकटीसाठी संकल्प
मुंबई / प्रतिनिधी :- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच 2025 ते 2029 या कार्यकाळासाठीच्या निवडणुका आज उत्साहात पार पडल्या. राज्यातील क्रीडा क्षेत्राला व्यापक दिशा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांचा विशेष उल्लेख सभेत करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक खेळ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन ऐतिहासिक ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
* खेळाडूंना अधिक संधी व सुविधा देण्याची भूमिका :- राज्यातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती (DPC) मधून किमान 1% निधी खेळांसाठी वापरता येतो, याचा अधिकाधिक वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हास्तरावर क्रीडा संरचना उभारणी, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक मैदाने व उपकरणे उपलब्ध करून देण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
* क्रीडा क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद वाढणार :- राज्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक चालना मिळावी यासाठी आगामी काळात क्रीडा विभागाचा निधी वाढविण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी जनतेच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशाच्या क्रीडा नकाशावर अग्रक्रमावर राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
* क्रीडा संस्कृती बळकट करण्याचा संकल्प :- राज्यातील युवा पिढीमध्ये क्रीडास्पर्धांच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली, शिस्तबद्धता, संघभावना आणि राष्ट्राभिमान यांचा विकास होईल, या उद्देशाने क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.
सभेच्या यशस्वी आयोजनामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. प्रशासकीय धोरणे, निधी आणि संकल्प या तिन्हींच्या बळावर आगामी काळात महाराष्ट्र ऑलिम्पिक चळवळीला अधिक उंची मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Social Plugin