* वनवठे येथील ‘नागझिरी बारव’ स्वच्छतेने उजळली
* गडकोट संवर्धनात श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान आघाडीवर
खालापूर - कर्जत / प्रतिनिधी :- इतिहास आणि संस्कृती जपणाऱ्या श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान या संस्थेने पुन्हा एकदा समाजासाठी आदर्श घालून दिला आहे. गेल्या आठवड्यात प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी वनवठे गावातील ऐतिहासिक ‘नागझिरी बारव’ (विहीर) या ठिकाणी साफसफाई व स्वच्छता मोहीम राबवून एक मौल्यवान वारसा पुनर्जीवित केला. गावातील शतकांपूर्वीची ही बारव चिखल, माती व झाडाझुडपांनी झाकली गेली होती. या बारवला ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व असल्याने प्रतिष्ठानने स्वतःच्या पुढाकाराने तिची साफसफाई केली.
* श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठानची ओळख :- श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान हे गेली कित्येक वर्षे गडकोट, मंदिरे, विरगळी, सातीशीला, आणि ऐतिहासिक बारवांचे संवर्धन करण्याचे कार्य करीत आहे. संस्थेने आतापर्यंत एकविरादेवी, आळे फाटा रेडा समाधी, साजगाव, कराडे, मोहोपाडा या ठिकाणांवरील गडदुर्ग, भुईकोट आणि विहिरींची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठानचे सदस्य समाजातील नागरिकांसोबत सहभागी होऊन “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश देत असतात.
* ‘नागझिरी बारव’चा इतिहास :- स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, नागझिरी बारव ही पूर्वी व्यापार करणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचे महत्त्वाचे ठिकाण होती. त्या काळी उन्हाळ्यात सात ते आठ गावांतील लोक या विहिरीतून पाणी भरत असत. काळाच्या ओघात ही बारव चिखलाने आणि कचऱ्याने भरली होती. श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तिची पाहणी करून पारंपरिक स्वरूपात स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
* स्वयंसेवकांचा निस्वार्थ सहभाग :- या स्वच्छता मोहिमेत 35 ते 40 हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. महत्वाचे म्हणजे या सर्व स्वयंसेवकांमध्ये नोकरदार पुरुष आणि महिला वर्गाचा मोठा सहभाग होता. ते आठवड्यातील एक सुट्टी समाजकार्याकरिता राखून ठेवतात आणि स्वतःच्या खर्चाने या मोहिमांमध्ये सहभागी होतात. त्यांचा हा उपक्रम “इतिहास जपण्यासाठीची खरी देशसेवा” म्हणून ओळखला जात आहे.
* वारसा वाचवणे म्हणजे संस्कृती टिकवणे :- प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. स्वच्छता आणि संवर्धन हे केवळ शारीरिक श्रम नव्हे, तर भावनिक जबाबदारी आहे. म्हणूनच आम्ही दर आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतो.
* स्थानीय नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव :- वनवठे येथील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले. गावकऱ्यांनी प्रतिष्ठानचे आभार मानत सांगितले की, या बारवची साफसफाई झाल्याने गावातील पाण्याचे साधन पुन्हा जिवंत झाले आहे. ही पिढ्यांसाठी प्रेरणा देणारी कृती आहे.



Post a Comment
0 Comments