Type Here to Get Search Results !

"स्वतंत्र कोकण राज्य अभियान"तर्फे ‘कोकणरत्न’ पदवी पुरस्कार विकास बिरवाडकर यांना जाहीर!

* सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान

* 13 डिसेंबर रोजी मुंबई येथे भव्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान

खालापूर - कर्जत / प्रतिनिधी :- कोकण प्रदेशाच्या विकासासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या रायगड मराठी प्रतिष्ठानचे प्रमुख संघटक आणि समाजसेवक विकास महादेव बिरवाडकर यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे “कोकणरत्न” पदवी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा मानाचा पुरस्कार येत्या 13 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील मराठी पत्रकार भवन (दुसरा मजला) येथे एका भव्य समारंभात प्रदान केला जाणार आहे.


* जनसेवेतून घडलेले व्यक्तिमत्व :- विकास बिरवाडकर गेली अनेक वर्षे सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्यरत आहेत. त्यांनी अल्पावधीतच आपल्या प्रामाणिक प्रयत्नांद्वारे जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. कुठलाही रुग्ण असो, हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला असो त्याला मदतीची गरज लागली की “विकास बिरवाडकर” हे नाव मदतीसाठी तत्पर असते. रुग्णालयांचे बिल कमी करून देणे, औषधोपचारात सहाय्य करणे आणि गरजूंसाठी रक्तदान शिबिरे आयोजित करणे असे असंख्य उपक्रम त्यांनी निस्वार्थ भावनेने राबवले आहेत.


* विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न :- समाजकार्याबरोबरच परिवहन आणि सार्वजनिक सुविधांच्या सुधारासाठी देखील बिरवाडकर प्रयत्नशील आहेत. त्यांनी “विरार-मानगाव लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी” सातत्याने पाठपुरावा केला आहे. या उपक्रमामुळे मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


* कोकणाशी घट्ट नाळ :- विकास बिरवाडकर यांचे मूळ गाव घूमेश्वर (ता. म्हसळा, जि. रायगड) असून ते सध्या विरार (मुंबई) येथे वास्तव्यास आहेत. अत्यंत मितभाषी, विनम्र आणि कार्यतत्पर स्वभावाचे असलेले बिरवाडकर नेहमी सांगतात की, माझा जन्मच समाजसेवेसाठी झाला आहे. जे काही शक्य आहे तेवढे समाजासाठी देणे हीच खरी पूजा आहे.


* कोकणाचा अभिमान :- स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी बिरवाडकर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना “कोकणरत्न” पदवी पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. या गौरवामुळे रायगड आणि कोकण परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विकास बिरवाडकर म्हणाले की, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, तर माझ्या कार्यात साथ देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.


या सन्मानाबद्दल बिरवाडकर यांच्यावर विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय अधिकारी, शिक्षकवर्ग आणि स्थानिक नागरिक यांच्याकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोकणातील जनसेवक, कार्यकर्ते आणि युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement