* आ. महेंद्र थोरवे यांचा ‘राजकीय चेकमेट’ - बंडोबा थंड
* शिंदे गटात दिवाळीनंतर भूकंप ? अफवा बुडाल्या चहाच्या कपात
* आ. थोरवे यांचा ‘चाणाक्ष’ डाव ; नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब ? विरोधकांचे डावपेच उधळले
खोपोली - कर्जत परिसरात दिवाळीचे दिवे विझण्याआधीच अनेक राजकीय ‘फटाके’ शांत झाले आहेत. “यंदा कर्तव्य आहे, बार उडवायचाच!” असा निश्चय करणाऱ्या अनेक मातब्बरांनी तलवार शेवटी म्यान केली गेली आहे आणि या नाट्यमय घडामोडींमागे ठाम नाव समोर येते - आमदार महेंद्र थोरवे.
राजकारण म्हणजे वेळ साधण्याचा खेळ... हे पुन्हा सिद्ध करीत थोरवे यांनी बंडखोरांना थंड करीत राजकारणातील चाणाक्षपणाची झलक दाखवली आहे. साम, दाम, दंड, भेद यांचा पुस्तकातला वापर प्रत्यक्षात दाखवत त्यांनी अनेक इच्छुक उमेदवारांना आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या महत्त्वाकांक्षांना, दिवाळीची मुहूर्तमेढ रोवत ‘थंड’ करून टाकले आहे.
* 'भूकंप’ बोलले पण हलले मात्र घरचेच भांडे :- दिवाळीनंतर शिंदे गटात भूकंप, मोठी फुट, नेते दुसरीकडे संसार थाटणार, अशा बातम्या सोशल मीडियावर 'नुसत्या व्हायरल’ झाल्या...पण प्रत्यक्षात ? धडाकेबाज भूकंपाची वदंता तर झाली, पण कंपनेही जाणवली नाहीत. स्टेटस वाजवत जगणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये बंड केले, बाकी कागदावर सगळे शांत.
* शेंडे यांच्यावर शिक्कामोर्तब ? :- विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या नावावर नगराध्यक्षपदाचा शिक्का जवळपास पक्का झाला आहे. यावेळी बंडोबांची शिल्लक हवा देखील काढून घेतली, असल्याचे दिसून येत आहे.
* कर्जतचा चेहराही ठरला ? बंडाचे ‘हॉटेल’ बंद :- कर्जत नगराध्यक्षपदासाठीचा चेहरा देखील निश्चित झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. येथेही बंडखोरीचा ‘बार’ बंद झाला आहे. एकीकडे उमेदवार निश्चितीची फाईल पुढे सरकतेय, तिकडे बंडखोरीची धाकधूक मागे हटतेय, असे चित्र शिवसेनेत दिसत आहे.
* विरोधकांची ‘जासूसी सेना’ सज्ज ? :- राजकारण आहे…जिथे कुरघोड्या नाहीत, तिथे राजकारण नाही विरोधकांतही हालचाल सुरू. काहीजण म्हणतात “बंडोबांना रसद आम्ही पुरवू, थंडी फार काळ टिकणार नाही.” मात्र, थोरवे यांच्या गोट्यातील संदेश स्पष्ट आहे की, घुसखोरी ? आलीच तर दारातच ‘शालजोडी’ने स्वागत!
* शिवसेनेचा दुर्ग भेदलाच नाही :- खोपोली - कर्जतमधील शिवसेनेचा अभेद्य किल्ला पडेल का, अशी चर्चा तापली होती. पण थोरवे यांनी गळती थांबवत राजकीय घर बांधून दाखवले. एकेक विटा सांभाळून, ‘डागडुजी’ करीत, कोण कुठे जाईल यावर नजर ठेवली आणि शेवटी सर्वांना आपल्या घरातच बसवले.
* आता ‘प्रचार युद्ध’ :- राजकीय मोर्चेबांधणी पूर्ण झाली आहे...तलवारी म्यान झाल्या आहेत...बंड थंड आणि चेहरे ठरले आहेत. आता आमदार थोरवे यांचा सारा फोकस प्रचारयुद्धावर आहे. “लढाईची पहिली फेरी जिंकली आहे… आता मैदानात उतरायचे” असा संदेश गोट्यात आला आहे.
राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, थोरवे यांनी वेळ साधली आहे. बंडखोरीच्या रेषा आधीच पुसल्या असून शहरी + ग्रामीण दोन्ही समीकरणे हातात आहेत. दुसरीकडे विरोधक गोंधळात अन् शिदेसेनेचे कार्यकर्ते उभे ठाकले आहेत. या डावात हरणार कोण, आणि ‘किंगमेकर’ कोण होणार…ते निवडणुकीत दिसेलच.
खोपोली–कर्जतमध्ये
राजकारण पेटलं होतं,
थोरवे यांनी शह दिला,
आणि तलवारी म्यान झाल्या…
आता ‘बंड’ नाही;
फक्त प्रचार आणि शह-काटशहाचा खेळ!
- फिरोज पिंजारी (संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज)



Social Plugin