* कर्जतच्या दत्ता ढाकवळ यांचा जागीच मृत्यू ; अनेक भाविक जखमी
* शेगाव-पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंना इगतपुरीजवळ अपघाताचा तडाखा
* पहाटे 6.40 वाजता घटना ; जखमींवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार
कर्जत - इगतपुरी / नरेश जाधव :- धार्मिक यात्रेला निघालेल्या कर्जत तालुक्यातील भाविकांच्या टेम्पो-ट्रॅव्हलला समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळ आज पहाटे गंभीर अपघात झाला. या अपघातात बस चालक दत्ता ढाकवळ (वय अंदाजे 30, रा. ढाक...सध्या रा. कुशीवली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 भाविक जखमी झाले. दरम्यान जखमी भाविकांपैकी सुरेश गौरू लाड (अण्णा) यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 25 प्रवासी असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन सतर्क आहे.
दहिवली पाटीलअळी येथील भाविकांचे हे मंडळ शेगाव व पंढरपूर दर्शनासाठी पहाटे 3 वाजता टाटा मिनी बस (MH 46 - AH 0767) ने निघाले होते. मात्र, इगतपुरीजवळ भोगदा क्र. 628.5 परिसरात बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस महामार्गाच्या बॅरिकेडला आदळली. धडक इतकी जोरदार होती की चालक दत्ता ढाकवळ यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. अपघाताची माहिती सुरक्षा रक्षक विनोद पवार व मंगेश महाजन यांना पहाटे 6.40 वाजता मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पवार, हवालदार योगेश जाधव तसेच सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेतली.
* जखमी भाविकांची नावे :- सुरेखा लाड, नंदकुमार मोरे राजेश लाड सर्व जखमींना तात्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तर मृत चालक दत्ता ढाकवळ यांचा मृतदेह हा शवविच्छेदनाकरीता नेण्यात आला आहे.
* प्राथमिक कारण - झोपेचा डोळा ? :- इगतपुरी पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, चालकाला झोप लागल्यामुळे बस बॅरिकेडवर आदळली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास इगतपुरी पोलिस करीत आहेत.
* गावात शोककळा ; भाविकांमध्ये भीतीचे वातावरण :- देवदर्शनाच्या यात्रेत घडलेल्या या अपघातामुळे ढाक व दहिवली परिसरात शोककळा पसरली आहे. दत्ता ढाकवळ यांच्या अचानक निधनाने गावात भावनिक वातावरण असून भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना सुरू आहेत.
* स्थानिक तरुणांची धावपळ :- घटनेची माहिती मिळताच कर्जत व परिसरातील तरुणांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व परतीसाठी मदतकार्य सुरू आहे.
या अपघातामध्ये मृत पावलेला चालक दत्ता ढाकवळ हा कर्जत तालुक्यातील ढाक येथील राहणार असून त्याच्या अपघाती मृत्यूची व अपघातामध्ये भाविक जखमी झाल्याची बातमी आल्यानंतर ढाक व दहिवली सह कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दत्ता ढाकवळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत जखमी भाविकांनी लवकर बरे व्हावे, अशी सर्वत्र प्रार्थना होत आहे.


Social Plugin