Type Here to Get Search Results !

पाचोऱ्यात राजकीय तापमान वाढले!

* किशोर आप्पांच्या ‘निर्धार मेळाव्या’ला भाजपचा ‘परिवर्तन मेळावा’ प्रतिस्पर्धी

* 1 नोव्हेंबरला शिंदे गटाचा निर्धार मेळावा, 5 नोव्हेंबरला भाजपचा परिवर्तन मेळावा

* दोन्ही पक्ष मैदानात उतरले : सत्ता राखण्याची व जिंकण्याची जोरदार तयारी

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पाचोऱ्यातील स्थानिक राजकारणात आगामी दिवसांत मोठी चुरस दिसणार हे आता स्पष्ट झाले आहे. 1 नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते व पाचोरा - भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘निर्धार मेळाव्या’नंतर आता 5 नोव्हेंबर रोजी भाजपकडून भव्य परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात येत आहे. निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप घोषित झाला नसला तरी दोन्ही पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला असल्याचे चित्र दिसत आहे. आचारसंहिता नसल्यामुळे राजकीय शस्त्रसज्जता खुलेआम सुरू झाली आहे.


* निर्धार वि. परिवर्तन : शक्ती प्रदर्शनाचा खेळ :- शिवसेना शिंदे गटाकडून नुकताच ‘निर्धार मेळावा’ हा शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती, नव्या प्रवेशांमुळे पक्षाची ताकद दाखवण्यात आली. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने ‘भव्य परिवर्तन मेळावा’ जाहीर करीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढवली आहे. या मेळाव्यासाठी राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी भाजपचा तोफांचा पहिला गोळीबार असे याचे वर्णन केले जात आहे.


* स्थानिक स्वराज्य निवडणुका केंद्रस्थानी :- पाचोरा - भडगांव नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही पक्षांनी संघटना सज्ज केली आहे. सत्ता टिकवणे शिवसेना शिंदे गटाचे ध्येय आहे तर सत्ता परत मिळवण्याची तयारी भाजपची भूमिका आहे. या निवडणुकीत प्रत्येक गाव, प्रत्येक विभागात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळेल, अशी चिन्हे आहेत.


* राजकीय समीकरणे बदलणार ? :- पाचोरा - भडगाव मतदारसंघात अलीकडेच अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करतांना दिसले, त्यानंतर आता भाजपनेही मोठ्या तयारीने मेळावा लावत परिस्थिती उलट दिशेला वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षांनी सभा, पक्षप्रवेश, बूथ स्तरावर बैठक, प्रचार मोहीम यांना गती दिली आहे. राजकारणात आता शांतता नव्हे तर झंझावाताचा काळ सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.


स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोन्ही पक्ष सत्ता समीकरणात एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर स्पर्धा टोकाची आहे. आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र मोहीम राबवितांना दिसत आहेत.


आता प्रश्न एकच आहे की, कोणाचा मेळावा जोरदार पडतो ? कोण जिंकणार जनतेचे मन व संघटनांची पकड ? प्रदेशात उत्सुकतेचे वातावरण असून पुढील काही दिवसांत राजकीय नाट्यमय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. पाचोरा - भडगाव मतदारसंघात आता फक्त निवडणूक जाहीर होण्याची औपचारिकता बाकी असून जनता, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते सर्वच युद्धभूमीवर सज्ज झालेले दिसत आहेत.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement