* 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू
* पहिल्या तीन दिवसांत अर्ज नसल्याने आज झालेली वाढ अधिकारी व मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाची
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. येत्या 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. प्रारंभीच्या तीन दिवसांत कोणताही अर्ज दाखल झाला नसताना, 13 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन प्रक्रियेला गती मिळाली.
* दोन उमेदवारांचे अर्ज दाखल :- सकाळी 11 वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण दोन उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. अधिकारी व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडींची नोंद घेण्यात आली असून पुढील दोन-तीन दिवसांत अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* निवडणूक प्रक्रियेकरिता सर्व सुविधा उपलब्ध :- निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून पारदर्शक, सुरक्षित आणि शांततामय वातावरणात नामनिर्देशन प्रक्रिया पार पडावी यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष, सीसीटीव्ही निरीक्षण, उमेदवार व प्रतिनिधींसाठी सुटसुटीत व्यवस्था, कायदेशीर सहाय्य आणि मार्गदर्शन या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
* निवडणूक शांततेत आणि पारदर्शकतेने होणार :- खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततेत, कायदेपालनासह आणि जनतेच्या सक्रीय सहभागातून पार पाडली जाणार असल्याचा विश्वास जनसंपर्क व माध्यम व्यवस्थापन पथक, खोपोली नगर परिषद निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील काही दिवसांत उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्जांची संख्या वाढण्याची दाट शक्यता असून खोपोलीतील राजकीय वातावरणात निवडणूक रंगत वाढण्याचे संकेत दिसत आहेत.


Post a Comment
0 Comments