Type Here to Get Search Results !

मविआत फूट ? काँग्रेसची मोठी घोषणा

* मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार

* विजय वडेट्टीवार यांची माध्यमांसमोर घोषणा

* मनसेबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही ; भ्रष्ट्राचार, पारदर्शकता आणि जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेस मैदानात उतरणार

मुंबई / प्रतिनिधी :- मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. महाविकास आघाडीत (मविआ) काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तीन पक्षांचा समावेश असला तरी, आता काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.


काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना म्हटले की, आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार सुरू आहेत, आणि आम्ही हे प्रश्न घेऊनच निवडणुकीत उतरणार आहोत.


* भ्रष्ट्राचार आणि खिरापतींचा बाजार थांबवू :- वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांवर टीका करताना म्हटले की, महापालिकेची तिजोरी आता रिकामी झाली आहे. भ्रष्टाचाराची खिरापत वाटली जात आहे. आम्ही या सर्व गोष्टींविरुद्ध लढा देण्यासाठी मैदानात उतरणार आहोत. जनतेचे प्रश्न, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे आमच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील.


त्यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या हायकमांडशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला गेला असून, स्थानिक कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसला बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले.


* भाई जगताप यांचे जुने विधान पुन्हा चर्चेत :- या घोषणेनंतर काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलेले विधान पुन्हा चर्चेत आले आहे. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही राज ठाकरे तर सोडाच, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही लढविणार नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, नेत्यांच्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची संधी द्यावी.


भाई जगताप यांनी स्पष्ट केले होते की, महाविकास आघाडी ही उद्धव ठाकरे यांचा एकट्याचा पक्ष नाही; ती एक संयुक्त युती आहे आणि स्थानिक निवडणुकीत निर्णय घेण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना असायला हवा.


* मविआत फूट पडली का ? :- वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीतील एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांसोबत काँग्रेस कितपत समन्वय ठेवणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसचा हा निर्णय म्हणजे स्वतःची स्वतंत्र ओळख आणि मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली असल्याचे मानले जाते.


मुंबई महानगरपालिकेत सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वर्चस्व आहे. 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीनंतर आता दोन वेगवेगळे पक्ष उभे आहेत. त्यामुळे मविआचे भविष्यातील राजकीय समीकरण नेमके कसे राहील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाविकास आघाडीतील या नव्या हालचालीमुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक रंगतदार आणि संघर्षमय होणार आहे, हे निश्चित.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement