Type Here to Get Search Results !

अखेर भडगाव ते वाडे बसफेऱ्या पुन्हा सुरू

* पत्रकार अशोक परदेशी यांच्या प्रयत्नांना यश

* प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवा पूर्ववत

* चालक-वाहकांचा सत्कार करून महामंडळाचे आभार

भडगाव / प्रतिनिधी :- भडगाव ते वाडे या मार्गावरील काही एस.टी. बस फेर्‍या गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात पत्रकार अशोक परदेशी यांनी सातत्याने पाठपुरावा करत एस.टी. महामंडळाकडे निवेदन देऊन बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून, 6 नोव्हेंबरपासून भडगाव ते वाडे दरम्यानच्या सर्व बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.


* उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तत्पर दखल :- अचानक बंद झालेल्या बसफेऱ्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. या समस्येवर उपाय म्हणून पत्रकार अशोक परदेशी यांनी 29 ऑक्टोबर रोजी भडगाव बसस्थानक वाहतूक निरीक्षक आर. एस. चौधरी आणि पाचोरा आगार प्रमुख यांना निवेदन दिले. त्यात त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, बसफेऱ्या तात्काळ सुरू न केल्यास प्रवाशांसह मी स्वतः भडगाव बसस्थानकासमोर उपोषणास बसणार आहे. या इशाऱ्यानंतर एस. टी. महामंडळाने तात्काळ कारवाई करीत सर्व बंद फेऱ्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.


* विद्यार्थी व प्रवाशांना दिलासा :- भडगाव–वाडे मार्गावरील फेऱ्या सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि विद्यार्थी वर्गांमध्ये मोठा दिलासा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावोगाव शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय आता दूर झाली आहे. या बसफेऱ्याचा लाभ भडगाव, कोठली, वढधे, निंभोरा, लोणपिराचे, बोरनार, बोदर्डे, कनाशी, देव्हारी, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, नावरे, बांबरुड प्र. ब., वाडे, टेकवाडे बुद्रुक आदी गावांतील नागरिकांना होणार आहे.


* चालक-वाहकांचा सत्कार करून आभार :- बससेवा सुरू झाल्यानंतर गुरुवारी (दि. 6 नोव्हेंबर) भडगाव बसस्थानकात एक छोटेखानी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार अशोक परदेशी, वाडे येथील पी. आर. माळी, पत्रकार राजू शेख यांच्या उपस्थितीत चालक शरद कोळी व वाहक वाय. डी. सैंदाणे यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर उपस्थितांनी अशोक परदेशी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांच्या चिकाटीमुळे प्रवाशांची मोठी अडचण दूर झाली, असे मत व्यक्त केले.


* एस. टी. महामंडळ आणि नागरिकांचे आभार :- अशोक परदेशी यांनी या निर्णयाबद्दल एस. टी. महामंडळ, पाचोरा आगार प्रशासन तसेच प्रवासी नागरिकांचे आभार मानले. ही बससेवा म्हणजे केवळ वाहतूक नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि तिला यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी भडगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक पी. एम. राठोड, कर्मचारीवर्ग, प्रवासी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement