Type Here to Get Search Results !

नगरदेवळा गावात आधार केंद्रांचा अभाव

* नोंदणी, दुरूस्तीसाठी नागरिकांची दररोज धावपळ 

* नगरदेवळा पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्र बंद

* नवीन मंजूर केंद्रालाही किट न दिल्याने काम ठप्प

* जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी

नगरदेवळा / प्रतिनिधी :- 15 ते 18 हजार लोकसंख्या असलेल्या नगरदेवळा गावात आजही नागरिकांना आधार कार्ड अपडेट, ई महासेवा व सीएससी सेंटरच्या अभावामुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


आधार कार्डसंबंधित कामांसाठी नागरिकांना तब्बल 25 किमी अंतरावरील पाचोरा, 13 किमीवरील भडगाव किंवा 35 किमीवरील चाळीसगाव येथे जावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व वृद्ध व्यक्तींना अपार त्रास सहन करावा लागत आहे.


* पोस्ट ऑफिसमधील केंद्र ठप्प :- नगरदेवळा पोस्ट ऑफिसमध्ये पूर्वी आधार अपडेट केंद्र सुरू करण्यात आले होते ; मात्र काही दिवसांपासून हे केंद्र बंद आहे. संबधित अधिकारी यांनी 24 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्य डाक अधिकारी, जळगांव यांना लेखी माहिती दिली आहे. दरम्यान, नागरिकांना सांगण्यात येते की “सिस्टम बंद आहे” किंवा “टेक्निकल प्रॉब्लेम” आहे, त्यामुळे कामकाज बंद ठेवले जाते. त्यामुळे दररोज शेकडो नागरिकांना निराश परतावे लागत आहे.


* नवीन केंद्र मंजूर पण किट नाही :- गावात एका व्यक्तीस नवीन सीएससी / आधार केंद्र मंजूर झाले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु आधार नोंदणी किट अद्याप न मिळाल्याने त्याचे कामकाज सुरू झालेले नाही. परिणामी गावात एकही कार्यरत केंद्र नाही.


* दररोज नागरिकांची धावपळ :- आधारसाठी नागरिकांना सकाळी लवकर बाहेरगावच्या केंद्रांवर जावे लागते. अनेक ठिकाणी टोकन पद्धत असल्याने उशीर झाला तर दिवसभराची वाट पहावी लागते, किंवा रिकाम्या हाताने परतावे लागते. विशेषतः वृद्ध, अपंग व विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.


* पत्रकार फिरोज पिंजारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी :- दै. कोकण प्रदेश न्यूजचे तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार फिरोज पिंजारी यांनी जळगांव जिल्हाधिकारी यांना या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. तसेच पाचोरा प्रातांधिकारी व तहसिलदार यांना देखील याबाबत लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नगरदेवळा गावाच्या लोकसंख्येनुसार किमान तीन  सीएससी / आधार केंद्र असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या एकही केंद्र कार्यरत नाही. जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा.


* नागरिकांचा एकमुखी सूर :- गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,  बंद असलेले पोस्ट ऑफिस केंद्र तत्काळ सुरू करावे, मंजूर केंद्राला किट देऊन कार्यान्वित करावे आणि आणखी दोन सेवा केंद्रांना परवानगी देण्यात यावी.


आजच्या डिजिटल युगात आधार सेवा, ई महासेवा व सीएससी केंद्र हे नागरिकांसाठी अत्यावश्यक आहेत. नगरदेवळा सारख्या मोठ्या गावात या सुविधा बंद पडणे म्हणजे प्रशासनाचा डिजिटल सेवांवरील दुर्लक्षाचा पुरावा आहे. नागरिक आता जिल्हाधिकारी साहेबांकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement