* खा. स्मिता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा संपन्न
* आ.मंगेश चव्हाण यांचे विकासाच्या स्पर्धेचे आव्हान
* भाजप नेत्यांकडून आ. पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर
पाचोरा / फिरोज पिंजारी :- पाचोरा शहरातील सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे भारतीय जनता पक्षाचा परिवर्तन मेळावा उत्साहात पार पडला. जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकविण्याचा संकल्प केला. या मेळाव्यास चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजप जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष डॉं. राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशाली सुर्यवंशी आणि मधुकर काटे यांची उपस्थिती लाभली.
* राजकारण नव्हे, विकासाची स्पर्धा करू - आ. चव्हाण :- आमदार मंगेश चव्हाण यांनी मेळाव्यात बोलतांना पाचोरा नगर परिषदेत कमळ फुलवायचे आहे, असा विजयी संकल्प कार्यकर्त्यांमध्ये जागवला. त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत सांगितले की, वैयक्तिक टीका सोडून विकासाची स्पर्धा करा. आम्ही विकासाच्या माध्यमातून जनता जिंकू. त्याचबरोबर त्यांनी आव्हान दिले की, चाळीसगावमध्ये शिंदेसेनेचा एक तरी नगरसेवक निवडून आणून दाखवा. यावेळी त्यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यातील बलून बंधारे चार वर्षांत पूर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले.
* स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता आणायची - खा. वाघ :- खासदार स्मिता वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पाचोरा-भडगावमध्ये खासदार निधीतून अनेक विकासकामे मंजूर केली आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून विजय मिळवावा. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपमध्ये पदासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी स्पर्धा असते. येत्या निवडणुकीत सत्ता भाजपचीच असेल.
* जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसेल - डॉं. चौधरी :- भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉं. राधेश्याम चौधरी यांनी आमदार किशोर पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत सांगितले की, भाजपचा कार्यकर्ता व्यक्तीपूजक नसतो, तो पक्षाच्या विचारसरणीवर काम करतो. आमदारांचा विजय हा भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा परिणाम आहे. जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसेल, हा आमचा विश्वास आहे.
* तिन्ही नेत्यांकडून आमदार किशोर पाटील यांना प्रत्युत्तर :- शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केलेल्या टीकेला वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे आणि दिलीप वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत परिवर्तन घडवून भाजपचाच झेंडा जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समितीवर फडकणार आहे.
* पाचोऱ्याची सत्ता आपलीच - मधुकर काटे :- भाजप नेते मधुकर काटे यांनी म्हटले की, गल्ली ते दिल्ली सत्तेवर आपलेच वर्चस्व आहे. आता पाचोऱ्याची सत्ता काबीज करायची आहे. जिल्हा परिषदेत 45 पेक्षा जास्त जागांवर भाजपचा विजय होईल आणि अध्यक्षपद देखील भाजपचे असेल.
या मेळाव्यात पत्रकारांच्या “व्हॉईस ऑफ मीडिया” संघटनेच्या पंढरपूर येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन भाजप नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक माने यांनी केले. या मेळाव्याला प्रताप पाटील, सुभाष पाटील, डी.एम. पाटील, संजय वाघ, संजय पाटील, रमेश वाणी, रहिम बागवान, कांतीलाल जैन, अमोल पाटील, भागवत महालपुरे, सुचिताताई वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपचा परिवर्तन मेळावा हा केवळ राजकीय कार्यक्रम नव्हे तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा शंखनाद ठरला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात आता “परिवर्तन विरुद्ध सत्तास्थैर्य” अशी राजकीय लढत रंगण्याचे स्पष्ट संकेत या मेळाव्यातून मिळाले आहेत.


Post a Comment
0 Comments