* आरोग्यदायी समाजासाठी स्त्रियांनी घ्यावी नियमित तपासणीची सवय
* नागरी सामाजिक विकास संस्था व टाटा मेमोरियल सेंटरचा संयुक्त उपक्रम
* रायगडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल (IPS) यांची प्रमुख उपस्थिती
खोपोली / दिनकर भुजबळ :- राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त नागरी सामाजिक विकास संस्था आणि टाटा मेमोरियल सेंटर (कर्करोग प्रतिबंध विभाग, खोपोली) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष “कर्करोग जनजागृती कार्यक्रम” उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा उद्देश महिलांना कर्करोग प्रतिबंध, लक्षणांची ओळख आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व समजावून सांगणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भुजबळ यांनी केले.
या कार्यक्रमास रायगडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल (IPS) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात महिलांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, कर्करोगाचा सामना केवळ उपचारानेच नव्हे, तर जागरूकतेने करता येतो. प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, हेच खरे सक्षमीकरण आहे.
कार्यक्रमास खालापूर डीवायएसपी डॉं. विशाल मेहुल, पोलिस निरीक्षक सचिन हिरे, सहायक पोलिस निरीक्षक पूजा चव्हाण, आरोग्य अधिकारी संगीता वानखेडे, डॉ. प्रेरणा पाटील, स्नेहल मॅडम, मेहबूब जमादार, स्वराज्य पोलीस मित्र संघटनाचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक मान्यवर उपस्थित होते.
टाटा मेमोरियल सेंटरच्या तज्ज्ञांनी महिलांना कर्करोगाचे विविध प्रकार, त्याची सुरुवातीची लक्षणे, लवकर निदानाचे फायदे, तसेच नियमित तपासणीचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. “लवकर तपासणी म्हणजे सुरक्षित भविष्य” हा संदेश कार्यक्रमातून दिला गेला.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या अध्यक्षा वर्षा राजेश मोरे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी व सहभागी महिलांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, महिलांनी आपल्या आरोग्याकडे वेळ देणं अत्यावश्यक आहे. समाज निरोगी हवा असेल, तर प्रथम स्त्रिया निरोगी असल्या पाहिजेत.


Post a Comment
0 Comments