Type Here to Get Search Results !

आदिवासी पारधी समाजावर अन्याय

* 90 वर्षीय लक्ष्मण काळे मरणाच्या दारात, तरीही नाही घरकुल…नाही जमिनीचा हक्क!

* ग्रामसेवकाकडून जातीय वागणुकीचा आरोप ; तुम्ही पारधी, इथे राहण्याचा अधिकार नाही

पुणे / स्नेहा मडावी :- शासन “सर्वसमावेशक विकास” आणि “सबका साथ, सबका विकास” अशा घोषणा देत असले तरी, प्रत्यक्षात काही समाज घटक आजही मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. याच वास्तवाचे हृदयद्रावक उदाहरण म्हणजे — आळंदी महातोबा (ता. हवेली) येथील 90 वर्षीय आदिवासी पारधी वयोवृद्ध लक्ष्मण रेंजमिट काळे.


* चार पिढ्यांचे वास्तव्य, तरीही घरकुल नाही :- लक्ष्मण काळे आणि त्यांचे कुटुंब गेल्या तीन-चार पिढ्यांपासून आळंदी महातोबा गावात राहतात. त्यांचे वडीलही याच गावातील स्मशानभूमीत दफन झाले होते. मात्र एवढे दीर्घ वास्तव्य असूनही काळे कुटुंबाला घरकुल योजना, जमीन हक्क किंवा कोणतीही शासकीय सवलत मिळालेली नाही. आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले म्हणाले की, गेल्या 15 वर्षांपासून काळे यांनी घरकुलासाठी अर्ज केला, पण प्रत्येक वेळी ग्रामपंचायत प्रशासनाने तो फाईलवरच ठेवला. 2010 आणि 2016/17 मध्ये फॉर्म भरून दिले तरी ग्रामसेवकाने प्रस्ताव वर न पाठविण्याचा प्रयत्न केला.


* ज्यांच्याकडे पैसा, त्यांनाच सुविधा - नागरिकांचा आरोप :- स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप करीत सांगितले की, ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा वैयक्तिक संबंध आहेत, त्यांनाच घर बांधणीची परवानगी मिळते. गरीब, आदिवासी आणि पारधी समाजातील लोकांकडे दुर्लक्ष केले जाते.


* तुम्ही पारधी, इथे राहण्याचा अधिकार नाही :- सर्वात धक्कादायक म्हणजे, ग्रामसेवकाने लक्ष्मण काळे यांना सांगितले की, तुम्ही पारधी, तुम्हाला गावात राहण्याचा अधिकार नाही… पुण्यात फुटपाथवर भिक्षा मागा. या अमानवी वक्तव्यामुळे वयोवृद्ध काळे मानसिकदृष्ट्या खचले, आणि सध्या ते पुण्यातील फुटपाथवर भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत आहेत.


* विभागीय आयुक्तांकडे निवेदन :- या घटनेच्या निषेधार्थ आखिल भारतीय आदिम महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने विभागीय आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद सीईओ गजानन पाटील आणि डेप्युटी सीओ भुषण जोशी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित ग्रामसेवकावर निलंबन व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी नामदेव भोसले, लक्ष्मण काळे, बलवंत पवार, कुणाल भोसले, सचिन भोसले, सुरेखाताई भोसले, आश्विनी काळे आदी उपस्थित होते.


* आदिवासींवर अन्याय आता थांबावा :- समाजसेवक नामदेव भोसले म्हणाले की, आदिवासी पारधी समाजावर सतत होत असलेला भेदभाव आणि प्रशासकीय दुर्लक्ष लाजिरवाणे आहे. शासनाने तात्काळ चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई करावी आणि काळे कुटुंबाला घरकुल मंजूर करावे. स्थानिकांनीही काळे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.


90 वर्षांच्या आयुष्यातही घर मिळविण्यासाठी संघर्ष करणारे लक्ष्मण काळे हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर आदिवासी पारधी समाजाच्या सामाजिक उपेक्षेचे जिवंत प्रतीक आहेत. शासनाच्या योजना फक्त कागदावर नकोत, त्या खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement