Type Here to Get Search Results !

रिक्षाचालकाचा मृत्यू : मदतीसाठी हाक मारून ही कुणी धावले नाही!

* खोपोलीत माणुसकीला काळिमा : अनोळखी समजून रिक्षाचालकाला मदत न करणाऱ्यांची निष्क्रीयता धक्कादायक

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरातील शास्त्रीनगर परिसरात आज दुपारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहरावर विषण्णतेची छाया पसरली आहे. एका रिक्षाचालकाला अचानक चक्कर येऊन तो रिक्षाच्या स्टिअरिंगवरच कोसळला. जीवासाठी झुंज देणाऱ्या त्या माणसाला वाचविण्याचा स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केला ; पण जवळच्या रिक्षाचालकांनी मात्र “तो आपला नाही” म्हणून मदतीचा हात पुढे केला नाही. शेवटी वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती दर्शन शेडगे यांनी दिली. ते सांगतात, “धडपडत असलेला त्या रिक्षाचालकाचा श्वास मंदावत चालला होता. मी जवळच असल्याने तातडीने धावलो. मी दर्शन शेडगे, शिबू शेख आणि हस्तिमल दुकानातील कामगारांनी मिळून त्याला उचलले. परंतु सर्वात धक्कादायक दृश्य म्हणजे, घटनास्थळापासून काही अंतरावर 15 हून अधिक रिक्षाचालक उभे असतानाही कोणी मदतीला पुढे आले नाही. उलट मदतीचा आवाज दिला तरीही त्यांनी दाद दिली नाही. नाव माहिती नाही, ओळख नाही, मग आम्ही का मदत करू ?  असा जणू मूक संदेश त्यांच्या वागण्यातून दिसत होता.


तत्काळ स्कूटीवर जावून खोपोली नगरपालिका रुग्णालयातून ॲम्बुलन्स बोलविण्यात आली. रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉंक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.


नंतर ओळख पटली मृत व्यक्तीचे नाव जनार्दन पोपट वाघ (वय 61), रा. वासरंग, जे स्वतः आयुष्यभर इतरांना मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व होते. परंतु त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या साथी रिक्षाचालकांनी मदतीला पुढे न येणे अतिशय वेदनादायक ठरले.


घटनेबाबत HELP Foundation चे गुरुनाथ साठेलकर यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, आज माणुसकी हरल्याचे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर पाहिले. तो अनोळखी असल्याने मदत करायला कुणी पुढे आले नाही. हे फक्त दु:खद नाही, तर समाजाच्या संवेदनाशून्य चेहऱ्याचे प्रतिबिंब आहे. घटनेनंतर निलेश यादव यांनी रिक्षा युनियन ग्रुपवर संदेश टाकला. तेव्हा अनेक रिक्षाचालक हॉस्पिटलकडे धावले, पण तोवर खूप उशीर झाला होता.


मनाला बोचणारा प्रश्न…ज्याने आयुष्यभर इतरांना मदत केली, त्याला शेवटच्या क्षणी मदतीला कोण नव्हते ? देव जनार्दन वाघ यांच्या आत्म्यास शांती देवो आणि समाजाला पुन्हा माणुसकीची जाणीव देवो, अशी प्रतिक्रिया आता चहुबाजूंनी उमटत आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement