Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम!

* “मीच फिक्स” म्हणणारे अनेक…पण भाजपाचे ‘फायनल टिकट’ कुणाच्या गळ्यात पडणार ? संघर्ष पेटलाय!

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पाचोरा - भडगाव तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुका जवळ येताच राजकीय तापमान इतके वाढलंय की गावातल्या चहा टपरीपासून व्हॉट्स अँप यूनिव्हर्सिटीपर्यंत एकच चर्चा “यंदा कोण बसणार ?"

भाजपात इच्छुकांची रांग जणू चांदणी चौकातल्या गर्दीसारखी दिवसेंदिवस वाढतेच आहे. प्राचार्य किरण काटकर यांच्यानंतर पाचोरा - भडगाव बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र पुंडलिक उर्फ रवी बाबा पाटील तर आता वैशालीताई सूर्यवंशी यांचे ‘अतिशय भावूक’ समर्थक प्रणय (मुन्ना) भांडारकर यांचे नाव चर्चेत झळकतंय. शिवाय युवाशक्ती म्हणत सागर पाटील यांनी काही दिवसांतच एवढा आवाज केला की गावात वारेच बदललेत. पण अजून भाजपात एंट्रीच नाही, म्हणून पक्षातला गेटकीपर पेन घेऊन थांबलाय - “फॉर्म कुणाचा भरायचा ?”


* एंट्री वाजवणार कोण ? मोदीच्या नावावर की गावाच्या बळावर ? :- शिवसेना शिंदे गटाचे नेते व आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आधीच रणशिंग फुंकले. “स्वबळावरच लढणार” मग काय, 1 नोव्हेंबरचा “निर्धार मेळावा” झाला, तितक्यात भाजपने 5 नोव्हेंबरचा “परिवर्तन मेळावा” ठोकून दिला.

राजकीय पंडितांचा अंदाज आहे की, हा मेळावा म्हणजेच काही जणांचा पक्ष प्रवेश, तर काही जणांचा ‘EXIT पोल’ ठरणार आहे. सगळ्यांचे डोळे सागर पाटील भाजपात उडी मारतात का ? याकडे लागले आहेत. उडी घेतली तर चर्चा, नाही घेतली तरी चर्चा - गावात दोन्ही मोफत!


* मुन्ना भांडारकर - शांत तरंग की गाजणारी लाट ? :- मुन्ना भांडारकरांच्या नावाने नगरदेवळा राजकारणाला झटका बसलाय. नाव जरा शांत, पण पाठबळ भारी. भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशींचे छत्र, भांडारकर कुटुंबाची उद्योजकीय प्रतिष्ठा, गावात "अर्थपूर्ण" ताकद. अनेक इच्छुक तर म्हणतात की, भांडारकर येणार तर आमचे नाव मागे ठेवा…आम्ही मुकसमर्थक...शाब्बास गावातल्या राजकीय सर्वसंमतीपेक्षा ही मुकसमंती भारी!


* रवी बाबा vs बाकी जग :- रवी बाबांची स्टाईल वेगळाच...काम, संघटना, गावात पकड आणि राजकारणाचे ज्ञान. पण नगरदेवळा मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढली की समीकरणे बिघडतातच. भाजपाने संधी न दिली तर गावगप्पेनुसार “रवी बाबा अपक्ष झेंडा घेऊन मैदानात येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


* सागर पाटील - भाजप नसले तरी शर्यत चालू :- सागर पाटील यांच्या समर्थकांचा जाज्वल्य विश्वास आहे की, "लढायचे तर लढायचेच!" भाजप नाही तर अपक्ष, पण मैदान सोडणार नाही.


* काटकर सर - गावची मास्टरमाइंड चाल ? :- प्राचार्य किरण काटकर यांची भूमिका अजूनही “क्लासरूम पॉलिटिक्स” मोडमध्ये आहे. बोलणे कमी, गणित जास्त…शांतपणे अरेंज, ॲंनालाईज्ड आणि टायमिंगची वाट पाहणारा खेळ. त्यांची चाल शेवटीच कळते आणि तेव्हाच गेम बदलतो.


* नाटक अजून बाकी :- आज स्थिती अशी की, सगळेच ‘मीच फिक्स’ म्हणतात, पण जनता म्हणते “फिक्स नाही, मिक्स आहे" आणि पक्ष म्हणतो “थांबा, बघू, योग्य वेळी सांगू!” दरम्यान, सगळे गाव फक्त एकाच गोष्टीची प्रतीक्षा करतंय किशोर आप्पांच्या शिलेदाराशी कोण भिडणार ? आणि भाजपाचा अधिकृत हिरो कोण ? राजकारणाची मॅच रंगलीये…आता बघायचं कोण सिक्स मारतो आणि कोण कॅच देतो.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement