* आदिलशाही फारुकी सामाजिक संस्थेचा उपक्रम
* शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रगतशील शिक्षक सय्यद जाकीर अली लियाकत अली यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. जळगाव येथील आदिलशाही फारुकी सामाजिक संस्था तर्फे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व श्रीमती सरोजिनी नायडू यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 यंदा जाकीर अली सरांना जाहीर करण्यात आला आहे.
* महाराष्ट्रातील 22 नामवंत व्यक्तींमध्ये जाकीर सरांचा समावेश :- महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 22 मान्यवर व्यक्तींना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा 23 नोव्हेंबर रोजी जळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या गौरवामुळे नगरदेवळा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
* शिक्षण क्षेत्रातील आदर्श कार्य :- सय्यद जाकीर अली सर हे सरदार एस. के. पवार विद्यालयात उर्दू विभागात शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत आहेत. शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते आणि मूल्याधारित शिक्षण यामुळे जाकीर सर विद्यार्थी आणि पालकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
* शिक्षण परंपरेचा वारसा :- जाकीर अली सर हे संस्थेतील माजी वरिष्ठ लिपिक लियाकत अली शौकत अली सैयद यांचे चिरंजीव असून, पैगंबरवासी शौकत अली सय्यद वजीर यांचे नातू आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा दोघांनीही या संस्थेत दीर्घकाळ सेवा बजावली असून, जाकीर सरांनी त्यांच्या शैक्षणिक परंपरेचा वारसा अधिक उज्ज्वल केला आहे.
जाकीर सरांच्या या यशाबद्दल ग्राम शिक्षण समितीचे व्हा. चेअरमन सुभाष थेपडे, मानद चिटणीस बापूसो शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, गनी शेठ, नथू महारू पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच प्राचार्य के. एन. काटकर सर, उपप्राचार्य व्ही. बी. गहरवाल सर, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर सर, डी. पी. राजपूत सर सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
* शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी उदाहरण :- जाकीर सरांचा हा गौरव केवळ वैयक्तिक नाही, तर गावातील आणि संस्थेतील सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आत्मविश्वासाची नवी दिशा मिळाली आहे.
“आदर्श शिक्षक पुरस्कार” हा सय्यद जाकीर अली सरांच्या कार्यनिष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण आणि समाजात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल आहे. नगरदेवळा व परिसरातील सर्व शिक्षक वर्गांत या सन्मानाने नव्या उमेदीचा आणि अभिमानाचा संचार झाला आहे.


Post a Comment
0 Comments