* जुन्या कार्यकर्त्यांचा बहिष्कार, काहींनी दिला राजीनामा ?
* आणखी पदाधिकारी जाण्याच्या तयारीत ; गटबाजीमुळे पक्षात गोंधळाचे वातावरण
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षात अंतर्गत असंतोषाचा ज्वालामुखी फुटू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली नाराजी आता उघडपणे व्यक्त होऊ लागली असून, काही कार्यकर्त्यांनी अधिकृतरीत्या पक्षाचा राजीनामा दिला आहे, तर अजून काही पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
* जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष :- तालुक्यातील जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नाराजीचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप पक्षांतर्गत केला जात आहे. एका नाराज कार्यकर्त्याने असंतोष व्यक्त करीत सांगितले की, आम्ही रात्रंदिवस मेहनत घेऊन पक्ष उभा केला, पण आता आम्हाला कोणी विचारत नाही. नव्या लोकांना प्राधान्य देऊन आम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे. या भावनेमुळे अनेक कार्यकर्ते सध्या राजकीय दिशा बदलण्याच्या विचारात आहेत.
* गटबाजी आणि मतभेदांचा कहर :- भाजपमध्ये सध्या गटबाजी आणि वैयक्तिक मतभेद उफाळून आले आहेत. स्थानिक पातळीवरील काही नेत्यांमध्ये सत्तेच्या वाटपावरून संघर्ष निर्माण झाला असून, त्याचा फटका थेट कार्यकर्त्यांना बसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाराज कार्यकर्त्यांनी जिल्हा नेतृत्वाशी संपर्क साधून तक्रारी केल्या, परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई किंवा आश्वासन मिळाले नाही. यामुळे नाराजी आणखी वाढली असून, वरिष्ठांकडून दुर्लक्ष हा कार्यकर्त्यांच्या तक्रारींचा मुख्य मुद्दा बनला आहे.
* प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जाण्याची शक्यता :- दरम्यान, तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकारी देखील लवकरच पक्षाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. या घडामोडींमुळे भाजपच्या जिल्हा नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा परिणाम थेट आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘धोक्याची घंटा’ :- राजकीय जाणकारांच्या मते, कर्जत तालुक्यातील भाजप संघटन सध्या अस्थिर स्थितीत आहे. कार्यकर्त्यांमधील असंतोष, गटबाजी आणि वरिष्ठ नेतृत्वाचे दुर्लक्ष ही परिस्थिती आगामी निवडणुकांमध्ये पक्षासाठी धोकादायक ठरू शकते. स्थानिक स्तरावर नव्या उमेदवारांच्या प्रवेशामुळे जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत, तर अनेक ठिकाणी पक्षांतर्गत गट संघर्ष उघडपणे दिसत आहेत.
* भाजपाला मोठा धक्का लागण्याची शक्यता :- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कशेळे परिसरातील एक मोठा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असून कर्जतमधील एक माजी नगरसेवक तसेच एक पत्रकार नेता देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या मनस्थितीत पोहचला असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी देखील नाराजांची गुप्त मिटींग झाली होती, परंतु तरीही जिल्हा व तालुका पदाधिकारी, आमदार प्रशांत ठाकूर तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांकडून भाजपाच्या नाराज आजी-माजी पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी, जेष्ठ व जुने जाणते नेते यांच्यासोबत चर्चा करून मतभेद का दूर केले जात नाहीत? दिलेली आश्वासने पूर्ण का केली जात नाहीत? आगामी नगर परिषद व त्यानंतर होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत जुने जाणते नेते व कार्यकर्त्यांची पक्षाला गरज नाही का? असा प्रश्न एका नेत्याने उपस्थित केला.
कर्जत तालुक्यात भाजपमधील वाढती नाराजी आणि राजीनाम्यांची मालिका पाहता, पक्षाची संघटनात्मक एकजूट धोक्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि विधानसभा रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर या अंतर्गत मतभेदांचा परिणाम भाजपच्या राजकीय समीकरणावर दूरगामी ठरण्याची शक्यता आहे.


Post a Comment
0 Comments