* भैरवनाथ मंदिरात जयघोषाने गुंजला परिसर
* दिंडी भक्तीमय वातावरणात कर्जत येथे दाखल
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- माऊलींचे आगमन म्हणजे भक्तीचा उत्सव आणि सेवाभावाचा सोहळा, याच भावनेने ह. भ. प. दत्तात्रय महाराज श्रीखंडे यांच्या वतीने श्रीखंडे परिवाराकडून ढोके - अंबरनाथ परिसरातून आलेल्या वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाच्या माऊलींच्या पालखीचे देऊळवाडी येथील ग्रामदेवी बहिरी तलई संस्थान भैरवनाथ मंदिरात भव्य स्वागत करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्यासाठी निघालेल्या या दिंडीचे आगमन सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता कर्जत तालुक्यातील देऊळवाडी येथे झाले. पालखीचे आगमन होताच “ज्ञानोबा माऊली - तुकाराम!” या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तगणांच्या “माऊली माऊली” घोषात भैरवनाथ मंदिर परिसर क्षणभरातच पांडुरंगाच्या नामस्मरणाने गाजून गेला.
दिंडीचे स्वागत करताना श्रीखंडे परिवारातील स्नेहा श्रीखंडे, वैशाली श्रीखंडे आणि करुणा थोरवे या महिला भक्तांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीतील चालक, रथचालक व विणेकरी तसेच डोक्यावर तुळस - वृंदावन घेतलेल्या मायमाऊलींचे पाण्याने पाय धुऊन औक्षण केले. यानंतर मंदिराच्या सभागृहात भाविकांनी भजन, कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून माऊलींचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला. भजनाने संपूर्ण देऊळवाडी परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली.
पालखी सोहळ्यात दिंडीचे चालक ह. भ. प. राजेश महाराज पाटील, ह. भ. प. बाळाराम महाराज पाटील, ह. भ. प. गोटीराम महाराज पाटील तसेच सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले ठाणे जिल्हा बँकेचे संचालक व उद्योजक राजेश पाटील यांचा श्रीखंडे परिवाराकडून शाल, श्रीफळ आणि फुलांच्या हारांनी सन्मान करण्यात आला.
दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व विश्रांतीची व्यवस्था श्रीखंडे परिवाराकडून करण्यात आली. तसेच रोटरी क्लब, कर्जत यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांना 100 पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स देऊन पुढील प्रवासासाठी मदत देण्यात आली. या सेवेमुळे वारकऱ्यांकडून रोटरी क्लब व श्रीखंडे परिवाराचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
स्वागत समारंभाला ह. भ. प. दत्तात्रय महाराज श्रीखंडे, साईनाथ श्रीखंडे, सतीश श्रीखंडे, विलास श्रीखंडे, रविंद्र श्रीखंडे, भैरवनाथ देवस्थान समितीचे किसन (आप्पा) बडेकर, दिलीप बडेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अरविंद जैन, डॉं. जंगम तसेच भास्कर बडेकर, भरत थोरवे, संजय बडेकर, हनुमंत गायकर, प्रभाकर राऊत, अशोक थोरवे, नितीन तुरडे, अजय बडेकर, विनोद बडेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्यासाठी अंबरनाथ ढोके परीसरातून श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी जाणाऱ्या दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी दरवर्षी आमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळते हे निश्चितच आमचे पूर्वजन्माचे भाग्य असल्याचे आम्ही मानतो, त्यामुळे पुढील काळात सुद्धा अशाप्रकारचे सद्भाग्य आम्हाला मिळावे म्हणजे आमच्यासह आमच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांसुद्धा माऊलींची सेवा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
- ह.भ.प.दत्तात्रय महाराज श्रीखंडे (किरवली, कर्जत - रायगड)


Post a Comment
0 Comments