Type Here to Get Search Results !

नगरदेवळा रेल्वे स्टेशन शाळेत माऊली फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

* सेवाभावी कार्यातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुलला आनंद

नगरदेवळा / प्रतिनिधी :- “सेवाभावी वृत्ती हीच खरी समाजसेवा” या भावनेतून कार्यरत असलेल्या माऊली फाऊंडेशन, भडगाव या संस्थेतर्फे नगरदेवळा रेल्वे स्टेशन वसाहतीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांना उबदार भेट मिळाल्याने शाळेतील वातावरण आनंदमय झाले.


हा उपक्रम फाऊंडेशनच्या मार्गदर्शिका दिपाली सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील 22 विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणताही विद्यार्थी या उपक्रमापासून वंचित राहू नये, यासाठी उर्वरित विद्यार्थ्यांसाठीही लवकरच नियोजन करण्यात येईल.


माऊली फाऊंडेशनने गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे ग्रामीण भागात शिक्षणाबाबत जनजागृती वाढली असून, अल्पसंपन्न विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळत आहे. शिक्षण हेच भविष्यासाठीचे खरे शस्त्र आहे आणि प्रत्येक बालक शिक्षणात मागे राहू नये, यासाठी माऊली फाऊंडेशन कटिबद्ध आहे, असे फाऊंडेशनच्या मार्गदर्शिका दिपाली सुर्यवंशी यांनी सांगितले.


थंडीपासून संरक्षण देणाऱ्या स्वेटरचे वाटप झाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. लहानग्यांनी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींना धन्यवाद देत आनंद व्यक्त केला. शिक्षक प्रविण पाटील यांनी फाऊंडेशनचे आभार मानत सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात संवेदनशीलतेचा संदेश जातो.


यावेळी मार्गदर्शक रवींद्र कुलकर्णी, अध्यक्ष योगेश शिंपी, बबीता बोरसे, उपाध्यक्ष प्रतिभा कुलकर्णी, संचालक संगिता जाधव, दिपमाला शिंपी, संजय सोनार (जुनी पेन्शन), संजय सपकाळे, करीमा खान, निंभोरा उपसरपंच विश्वासराव पाटील, शिक्षक प्रविण पाटील, शाहीद शेख, संतोष सपकाळे, समाधान पाटिल, कैलास भोई आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement