Type Here to Get Search Results !

वालीवमध्ये ‘सूर्या’चे पाणी पेटले!


* श्रेयाच्या राजकारणावरून बविआ गटात वादाची ठिणगी

* सूर्याचे पाणी आम्ही आणले - सोशल मीडियावर बॅनरबाजी, प्रतिगटांचा विरोध 

वसई / प्रतिनिधी :-  वसई - विरार महानगरपालिकेतील संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचे तापमान चढले आहे. आता या राजकीय गदारोळात ‘सूर्या पाणीपुरवठा योजना’ ही देखील अडकली आहे. वालीव परिसरात सूर्या योजनेचे पाणी आल्यानंतर या कामाचे श्रेय घेण्यासाठी दोन गट आमने-सामने आले असून, बविआ (बहुजन विकास आघाडी) गटातच वादाची ठिणगी पेटली आहे.


* हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली योजना :- बहुजन विकास आघाडीच्या कार्यकाळात माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून वसई तालुक्यासाठी सूर्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे संपूर्ण वसई तालुक्याची पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी झाली, परंतु काही भागांमध्ये अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून पाणीपुरवठ्याची लाईन वळविण्यात आल्याने स्थानिक नागरिक त्रस्त होते. विशेषतः सभापती कन्हैया भोईर यांच्या काळात वालीव प्रभागातील पाणी त्यांच्या स्वतःच्या प्रभागात वळविल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. त्यामुळे वालीव भाग सूर्या योजनेच्या फायद्यापासून वंचित राहिला होता, अशी नाराजीही व्यक्त केली जात आहे.


* सूर्याच्या पाण्यावर ‘श्रेय युद्ध’ सुरू :- सध्या वसई-वालीव परिसरात सूर्या पाणीपुरवठ्याचे श्रेय घेण्यासाठी दोन गटांमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. एका गटाने सोशल मीडियावर आणि बॅनरद्वारे प्रचार सुरू केला आहे.  सूर्याचे पाणी आम्हीच वालीवमध्ये आणले ! मात्र, या एकतर्फी प्रचारावर दुसऱ्या गटाकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला आहे. पूर्वीही अशाच प्रकारे सोशल मीडियावर प्रचार सुरू झाल्याने बविआच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मतभेद उघडकीस आले होते.


* बैठकीत ठरले होते संयुक्त निर्णय :- या वादावर स्पष्टीकरण देताना माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, 5 नोव्हेंबर 2024 रोजी जयनगर येथे माजी महापौर नारायण मानकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील, वालीव महिला आघाडी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अमृत योजनेतून वालीवला सूर्या पाणी पुरवठा देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेसाठी माजी सभापती स्व. अब्दुल हक पटेल यांनीही आपल्या कार्यकाळात प्रयत्न केले होते. त्यांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच वालीवला सूर्या पाणी मिळाले, असे माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. या योजनेचे श्रेय कुणा एकट्याला देता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


* वरिष्ठांकडे तक्रारी :- एकतर्फी प्रचाराबद्दल स्थानिकांनी वरिष्ठ पक्षनेत्यांकडे तक्रारी दाखल केल्याचेही समोर आले आहे. काही जण जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान विसरून स्वतःचे नाव पुढे करत आहेत. हे समाजसेवकांचा अपमान असून, पक्षांतर्गत नाराजीचे कारण ठरू शकते, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.


* समाजसेवकांचे योगदान दुर्लक्षून श्रेय घेणे लाजिरवाणे :- राजकारणात अनेक वर्षे सक्रिय असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सूर्या पाणी योजनेसाठी अनेकांनी अथक मेहनत घेतली. आता काही जण स्वतःचे नाव पुढे आणून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खेदजनक आणि पक्षासाठी घातक आहे.


* राजकीय पाणी तापलेले :- वालीवला सूर्या पाणी आले असले तरी राजकीय तापमान मात्र सूर्याहून अधिक उष्ण झाले आहे. श्रेयाच्या वादामुळे बविआ गटात अंतर्गत असंतोष वाढला असून, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.


सूर्या पाणी योजनेमुळे वसई-वालीवची तहान भागली असली तरी राजकीय पातळीवर मात्र ‘श्रेयाचे पाणी’ अजूनही खळखळते आहे. विकासाच्या कामावरून सुरू झालेले हे श्रेययुद्ध, वसई- विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत नक्कीच राजकीय पाणी आणखी ढवळून काढेल, असे संकेत सध्या दिसत आहेत.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement