* काँक्रीटीकरण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार
* स्वप्निल भावसार, चौधरी, पिंजारी यांची प्रतिक्रिया
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील वॉंर्ड क्रमांक 3 मधील भावसार गल्लीतील नागरिकांनी प्रशासन आणि जनप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केला आहे. याबाबत स्वप्निल भावसार, करीम पिंजारी, भालचंद्र चौधरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत स्पष्ट इशारा आहे की, भावसार गल्लीचे काँक्रीटीकरण तातडीने करण्यात आले नाही, तर आम्ही येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकू!
* विधानसभा निवडणुकीत दिले होते आश्वासन :- ग्रामस्थ स्वप्निल भावसार, करीम पिंजारी आणि भालचंद्र चौधरी यांनी ‘दै. कोकण प्रदेश न्यूज’शी बोलताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्हाला ठोस आश्वासन देण्यात आले होते की, भावसार गल्लीचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. त्यासाठी निधी मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत त्या वचनाची पूर्तता झालेली नाही.
* गावात सगळीकडे काम, पण भावसार गल्लीला न्याय नाही :- स्वप्नील भावसार यांनी सांगितले की, गावातील इतर भागांमध्ये काँक्रीटीकरण आणि विकासाची कामे पूर्ण झाली आहेत, पण भावसार गल्ली मात्र आजही खड्डेमय आणि चिखलयुक्त अवस्थेत आहे. या गल्लीतून शाळेचे विद्यार्थी ये-जा करतात, संगमेश्वर येथील नागरीक, महिला रहदारी करतात. पावसाळ्यात इथे चालणे सुद्धा अवघड होते. शाळकरी मुले, वृद्ध आणि महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. आम्ही वारंवार तक्रारी केल्या, पण कुणीही लक्ष दिले नाही, असे भावसार यांनी सांगितले.
* आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तातडीने लक्ष द्यावे :- भावसार गल्लीतील रहिवाशी स्वप्निल भावसार, करीम पिंजारी, भालचंद्र चौधरी यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना विनंती केलु आहे की, आपण सर्वसामान्य मतदारांना दिलेले वचन पाळावे. काँक्रीटीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा आम्हाला बहिष्काराचा मार्ग पत्करावा लागेल.
* निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा :- त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जोपर्यंत आमच्या गल्लीचे काँक्रीटीकरण होत नाही, तोपर्यंत आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकू. आमच्या मताचा उपयोग फक्त वचनपूर्तीसाठीच व्हायला हवा, खोट्या आश्वासनांसाठी नाही.
* स्थानिक प्रशासनावरही ताशेरे :- नागरिकांनी स्थानिक प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, नगरदेवळा गावातील बहुतांश ठिकाणी विकासकामे पूर्ण झाली, पण भावसार गल्लीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी फक्त कागदोपत्री कामे दाखवत आहेत का ? असा प्रश्न स्वप्नील भावसार यांनी उपस्थित केला आहे.
भावसार गल्लीतील नागरिकांनी सांगितले की, आम्हाला राजकारण नको, फक्त विकास हवा. आम्ही कर भरतो, मग आम्हालाच मूलभूत सुविधांसाठी का लढावे लागते ? त्यांनी शासन आणि आमदार यांना विनंती केली आहे की, भावसार गल्लीचे काँक्रीटीकरण तातडीने सुरू करून नागरिकांना न्याय द्यावा.


Post a Comment
0 Comments