* आळंदी येथे विद्युत रोषणाईचे काम करताना एचटी लाईनचा धक्का बसून अपघाती मृत्यू - वारकरी पंथात शोककळा
खालापूर / प्रतिनिधी :- आळंदी येथे कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रोषणाईच्या तयारीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. खालापूर तालुक्यातील वणवे गावचे रहिवासी व वारकरी पंथातील भक्त ह. भ. प. नितीन मोहन घोलप यांचे विद्युत धक्क्याने जागीच निधन झाले. या आकस्मिक घटनेने संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि वणवे गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ह. भ. प. नितीन मोहन घोलप हे आपल्या गावातील भैरवनाथ मंदिरातील रोषणाईचे काम पूर्ण करून आळंदी येथील धर्मशाळेत कार्तिकी एकादशीनिमित्त विद्युत रोषणाईचे काम करीत होते. काम सुरू असतानाच वरून प्रवाहित होत असलेल्या एचटी (HT) वीजवाहिनीचा जोरदार धक्का त्यांना बसला. धक्का बसल्याने ते उंचावरून खाली कोसळले आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वारकरी पंथ, गावकऱ्यांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. नितीन घोलप हे वारकरी परंपरेशी घट्ट नाते राखणारे, भक्तीभावाने प्रेरित, अत्यंत शांत व विनम्र स्वभावाचे व्यक्ती म्हणून ओळखले जात. त्यांच्या आकस्मिक निधनाने वणवे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कालच कामशेत येथे दिंडीत ट्रक घुसून एका वारकरी महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्याच्यानंतर आज पुन्हा ह. भ. प. नितीन मोहन घोलप यांच्या अपघाती निधनाने वारकरी संप्रदायात शोकाची छाया अधिक गडद झाली आहे.


Post a Comment
0 Comments