* “रक्तदान श्रेष्ठदान” संदेशासह मानवतेची भावनादायी प्रेरणा ; नागरिकांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन
अलिबाग / प्रतिनिधी :- सामाजिक बांधिलकी जपत चौल - रेवदंडा बायपास रोडवरील स्पाईस रेस्टॉरंटतर्फे “एक पाऊल समाजासाठी” या उपक्रमांतर्गत मंगळवार, 4 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हे शिबिर पार पडणार असून या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व समाजात पोहोचविण्याचा उद्देश आहे.
आयोजकांनी माहिती देताना सांगितले की, “रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर ती मानवतेची सर्वोत्तम सेवा आहे. एका युनिट रक्तातून तीन जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पुढे येवून रक्तदानासाठी हात पुढे करावा. या शिबिरासाठी वैद्यकीय पथक उपस्थिती राहणार असून, रक्तदात्यांच्या सुरक्षेची सर्व वैद्यकीय खबरदारी घेतली जाणार आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रमाणपत्र देण्यात येईल, तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शनही केले जाईल.
समाजात रक्ताची कमतरता भासू नये आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परिसरातील युवक-युवती, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक वर्ग व नागरिकांनी उत्साहाने रक्तदानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी जागेवर नोंदणीची सोय करण्यात आली आहे, असे आयोजकांनी सांगितले.


Social Plugin