* शेतकरी प्रेमराज पाटील यांच्यावर मोठा आर्थिक आघात ; परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ
पाचोरा / प्रतिनिधी :- लासगाव परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा थैमान घालत चार म्हशी व दोन पारडू सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शेत शेडमधून चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे पशुपालकांत मोठी चिंता पसरली आहे.
लासगाव येथील शेतकरी प्रेमराज आनंद पाटील (प्रेमा आप्पा) यांच्या बांबरूड राणीचे रोडलगत असलेल्या शेतातील शेडमध्ये हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शेडमधील चार दुभत्या म्हशी आणि दोन पारडू चोरून बांबरूड - सामनेर रोडवर नेऊन वाहनात भरले व पसार झाले.
चोरी लक्षात येताच पाटील यांनी तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. घटनास्थळी गाई-म्हशींच्या शृंखला तुटलेल्या अवस्थेत सापडल्या असून चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचे स्पष्ट दिसते.
या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांत तीव्र नाराजी असून, लासगाव, सामनेर, बांबरूड परिसरात गस्त वाढवावी व या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांत गावात संशयास्पद हालचाली दिसून येत होत्या. तरी देखील चोरट्यांनी पोलिसांना चकवा देत शेतकऱ्यावर मोठा आर्थिक भार टाकला आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, नजीकच्या गावांमधील सीसीटीव्ही फुटेज, वाहन चेकपोस्ट नोंदी तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.


Social Plugin