* जळगाव महापालिका निवडणूक 2025 : नारीशक्तीचे नवे पर्व सुरू
* 75 पैकी तब्बल 38 जागा महिलांसाठी राखीव ; आता महापालिकेत महिलांचे वर्चस्व
जळगाव / प्रतिनिधी :- जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (2025) मंगळवारी (दि. 11) झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीने शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय झाला आहे. या सोडतीत प्रस्थापित नेत्यांना दिलासा, तर अनेक इच्छुक आणि नव्या चेहऱ्यांना धक्का बसला आहे. यामुळे पक्षांतर्गत तिकीट वाटपाच्या संघर्षाची नांदी झाली असून, जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
* प्रस्थापित नेत्यांचे “सेफ” प्रभाग :- या सोडतीत माजी महापौर नितीन लढ्ढा, सीमा भोळे, जयश्री महाजन आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे प्रभाग आरक्षण पूर्ववत राहिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या नेत्यांच्या तिकीटाच्या वाटचालीस अडथळे नाहीत, तर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
* इच्छुकांना मोठा धक्का :- आरक्षण सोडतीमुळे काही जुन्या राजकीय कुटुंबांच्या योजना पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. माजी नगरसेवक अण्णा भापसे यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव ठरल्याने त्यांच्या नातवाचा उमेदवारीचा मार्ग बंद झाला आहे. तर माजी नगरसेवक श्यामकांत सोनवणे यांचा प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्याने त्यांनाही उमेदवारी शक्य राहिलेली नाही. याशिवाय चेतन सनकत यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठरल्याने त्यांची दावेदारी थेट अडचणीत आली आहे.
* प्रभागनिहाय रचना आणि राजकीय समीकरण :- महापालिकेच्या एकूण 19 प्रभागांपैकी 18 प्रभागांमध्ये चार सदस्य, तर एका प्रभागात तीन सदस्य अशी रचना करण्यात आली आहे. बहुतेक ठिकाणी ‘ड’ गट सर्वसाधारण प्रवर्गात ठेवण्यात आल्याने सर्वसाधारण उमेदवारांची संख्या वाढणार आहे. यामुळे पक्षांतर्गत तिकिटांसाठी मोठी रस्सीखेच आणि गटबाजी होण्याची शक्यता आहे.
* महिला उमेदवारांचा उदय :- महिला आरक्षण वाढल्याने अनेक नवीन महिला चेहऱ्यांना यंदा राजकारणात संधी मिळणार आहे. काही अनुभवी नेत्यांनी आपल्या पत्नी, मुली किंवा कुटुंबातील महिलांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात महिला नेतृत्वाची नवी पिढी उदयास येणार, हे निश्चित आहे.
* काही नेत्यांचा पत्ता कट :- प्रभाग 4 ‘अ’ मध्ये भारती सोनवणे यांची दावेदारी सर्वसाधारण गटातून कायम असली तरी, प्रभाग 6 मध्ये ॲंड. शुचिता हाडा, प्रभाग 7 मध्ये दीपमाला काळे, प्रभाग 8 मध्ये कुलभूषण पाटील व अमर जैन यांच्यासाठी “सेफ झोन” निर्माण झाला आहे.
* आता लक्ष महापौर आरक्षणाकडे :- प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य शासनाकडून सर्व महानगरपालिकांसाठी महापौर आरक्षण एकाच वेळी जाहीर होणार असून, त्याची उत्सुकता सर्वत्र वाढली आहे.
* हरकती व अंतिम प्रक्रिया :- या प्राथमिक आरक्षणावर 17 नोव्हेंबरपासून हरकती आणि सूचना स्विकारल्या जातील. 24 नोव्हेंबर ही अंतिम मुदत, तर 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.
जळगाव महापालिकेच्या आरक्षण सोडतीने एकीकडे प्रस्थापितांना दिलासा दिला, तर नव्या इच्छुकांना मोठा धक्का बसला. महिलांसाठी वाढलेले आरक्षण ही नवी राजकीय दिशा ठरणार असून, शहरात ‘नारीशक्तीचे नवे पर्व’ सुरू झाले आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
* आरक्षण सोडतीचे ठळक मुद्दे :-
प्रवर्ग एकूण जागा - महिलांसाठी राखीव
अनुसूचित जाती 5 - 3
अनुसूचित जमाती 4 - 2
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) 20 - 10
सर्वसाधारण 46 - 23
एकूण 75 - 38
या आकडेवारीनुसार, जळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात महिलांचे वर्चस्व निश्चित झाले आहे. 75 पैकी तब्बल 38 जागा महिलांसाठी आरक्षित, म्हणजेच महापालिकेत निम्म्याहून अधिक महिला नगरसेविका निवडून येण्याची शक्यता आहे.


Post a Comment
0 Comments