* मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळ, अकोला तर्फे अन्नदानाची सात वर्षांची अखंड परंपरा - शुभमच्या स्मृतीप्रित्यर्थ मातोश्री मुग्धा कळमकर यांच्याद्वारे गरजूंना अन्नदान
अकोला / प्रतिनिधी :- अकोला जिल्ह्यातील मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळ तर्फे सुरू असलेला अन्नदानाचा सात वर्षांचा अखंड उपक्रम आज एका भावनिक प्रसंगाने अधिक अर्थपूर्ण ठरला. चि. शुभम मुग्धा मुकेश कळमकर यांच्या वर्षश्राद्धानिमित्त, त्यांच्या मातोश्री मुग्धा कळमकर (मॅडम) यांनी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय, अकोला येथे गरजू बांधवांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करून दिवंगत शुभमच्या स्मृतीला आदरांजली वाहिली.
* सात वर्षांचा सेवाभावी प्रवास :- नोव्हेंबर 2018 पासून सुरू झालेला हा अन्नदान उपक्रम आज सात वर्षे पूर्ण करून आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे. मंडळाचे कार्यकर्ते दर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9 वाजता जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात उपस्थित राहून गरजूंना व रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदानाचे वितरण करतात. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कोणत्याही रूपाने, कुणालाही उपाशी रहावे लागू नये. म्हणूनच, मंडळाने समाजातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाला वाढदिवस, लग्नाची वर्षगाठ, स्मृतिदिन किंवा कुठल्याही विशेष प्रसंगी अन्नदान करायचे असेल, तर ते या संस्थेमार्फत करू शकतात.
* शुभमच्या स्मृतीतून समाजसेवेचा संदेश :- 11 नोव्हेंबर 2025 रोजी, शुभमच्या वर्षश्राद्ध प्रित्यर्थ त्यांच्या मातोश्री मुग्धा कळमकर मॅडम यांनी संपूर्ण अन्नदानाचा खर्च वहन करून, गरजूंना अन्नदान करून एक सामाजिक संदेश दिला. या उपक्रमाद्वारे त्यांनी आपल्या पुत्राच्या स्मृतीला जिवंत ठेवत समाजात “सेवा हाच धर्म” हा संदेश पोहोचवला.
मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळाच्या वतीने अध्यक्ष राजेश धनगावकर, राहुल खंडाळकर, सिद्धार्थ इंगळे, कमलजीत कौर आणि केलविन सुबि कौर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी मुग्धा कळमकर यांचे योग्य ठिकाणी अन्नदान करून समाजात सकारात्मकतेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले. मंडळाच्या वतीने चि. शुभम यांना भावपूर्ण श्रद्धांजली व अभिवादन करण्यात आले.
* समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम :- या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. शुभमच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान करून कळमकर कुटुंबाने समाजापुढे एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. याचबरोबर नागरिकांना आवाहन करण्यात आले की, आपल्या आनंदाच्या वा स्मृतीच्या प्रसंगी अन्नदान करून आपणही समाजसेवेचा भाग व्हावा.


Post a Comment
0 Comments