Type Here to Get Search Results !

भडगावात रब्बी हंगामातील अनुदानित बियाणे वाटपात गंभीर अनियमितता ?

* शेतकऱ्यांना न मिळालेले बियाणे दुसऱ्याच दिवशी एजन्सीच्या गोदामात संपले

* सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांची सखोल चौकशीची मागणी

भडगाव / प्रतिनिधी :- भडगाव तालुक्यात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत व अनुदानित रब्बी हंगामातील बियाणे वाटप करण्याची शासनाची योजना असताना प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीच न लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी कार्यालयाकडून “बियाणे आलेले नाही” असे सांगण्यात आले, परंतु त्यानंतर खाजगी व्यापारी एजन्सीकडे तपास केला असता “3050 पिशव्या शेतकऱ्यांना वाटून झाल्या आहेत” असा दावा करण्यात आल्याने संशयाला उधाण आले आहे.


* शेतकऱ्यांना न माहिती, न संदेश - बियाणे गुपचूप वाटप ? :- तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना बियाणे वाटपाची माहिती देण्यात आली नाही. ना शासकीय जाहिरात, ना पंचायतमार्फत सूचना, ना एसएमएस (SMS), अचानक बियाणे आल्याचे आणि दुसऱ्याच दिवशी “वाटप संपल्याचे” सांगण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त आहेत.


* काळाबाजाराचा संशय - विजय पाटील यांची चौकशीची मागणी :- सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील (भडगाव) यांनी या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा कृषी अधीक्षक आणि भडगाव पोलिसांकडे तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.


त्यांनी सांगितले की, एका दिवसांत मोफत अनुदानित बियाणे येते आणि दुसऱ्याच दिवशी खाजगी व्यापारी एजन्सीवर ‘वाटप संपले’ अशी नोंद होते, हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे.


* पूर्वीही काळाबाजार - तेव्हाही भडगावातील एजन्सीची परवाना रद्द :- सदरच एजन्सीमध्ये यापूर्वीही काळाबाजार झाल्याचे आरोप विजय पाटील यांनी सांगितले. त्या वेळी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी गोर्डे यांच्या कार्यकाळातही अशाच स्वरूपाची अनियमितता झाली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाटील यांनी भडगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. परिणामी, जिल्हा अधीक्षक (जळगाव) यांनी त्या व्यापारी एजन्सीचा परवाना रद्द केला होता. तरीही अशाच प्रकारचा संशयास्पद प्रकार पुन्हा घडल्याने शंका अधिकच गडद झाली आहे.


* खाजगी दुकानदारांकडे बियाण्याचा साठा ? :- शेतकऱ्यांना न मिळालेल्या 3,050 बियाण्याच्या पिशव्या प्रत्यक्षात कोणाला दिल्या ? कोणत्या शेतकऱ्यांना मिळाले ? वितरणाचा पंचनामा कुठे आहे ? यादी उपलब्ध नाही का ? की बियाणे काळाबाजारात गेले ? या प्रश्नांची उत्तरे देणे कृषी विभागासाठी कठीण ठरत आहे.


* काय मागणी केली आहे ? :- विजय पाटील यांनी या बियाणे वितरण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जुनी काळाबाजारात सापडलेली एजन्सीला परत कधी आणि कशी परवानगी देण्यात आली याची माहिती द्यावी. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी - कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करावा. अनुदानित बियाणे प्रत्यक्ष पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी तातडीने पुरवठा सुनिश्चित करावा, अशा मागण्या केल्या आहेत.


* शेतकऱ्यांमध्ये संताप - प्रशासनाकडे उत्तरांची मागणी :- अनुदानित बियाणे वाटपाच्या नावाखाली हा प्रकार उघड झाला असून शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. “आम्हीच पात्र, पण बियाणेच मिळाले नाही… मग गेले कुठे ?” असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. या गंभीर प्रकरणावर कृषी विभाग काय कारवाई करणार, एजन्सीचे संरक्षण कोण करत आहे आणि शेतकऱ्यांचे हक्काचे बियाणे त्यांना मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement