* जिल्हा परिषद निवडणुकीत सागर पाटील यांची लोकप्रियतेत आघाडी
* रावसाहेब पाटील दुसऱ्या क्रमांकावर, रवी बाबा पाटील मागे
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा - बाळद गटातील राजकीय समीकरणांना रंग चढू लागला आहे. याच दरम्यान एका खासगी ऑंनलाईन सर्वेतून स्थानिक जनतेच्या पसंतीचा कल स्पष्ट होत आहे. सलग सहा दिवस चाललेल्या या ऑंनलाईन सर्वेत एकूण 2067 मतदारांनी सहभाग नोंदविला होता.
सर्वेक्षणात नगरदेवळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सागर पाटील यांनी 58.2% मते मिळवत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गिरधर पाटील (रावसाहेब जिभू) यांना 37.74% मतदान झाले. तर भाजपचे इच्छुक म्हणून चर्चेत असलेले रविंद्र पुंडलिक पाटील (रवी बाबा) तिसऱ्या स्थानावर राहिले.
सर्वेक्षणात संभाव्य इच्छुक किंवा चर्चेत असलेल्या इतर काही नावांचा उल्लेख नव्हता, त्यात किरण काटकर सर, समाजसेवी छोटू लोहार, मुन्ना भांडारकर यांचा समावेश होतो. सागर पाटील यांच्या आघाडीमुळे त्यांचे समर्थक व स्थानिक युवकवर्गांत उत्साहाचे वातावरण आहे. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाकडून सागर पाटील यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.
सागर पाटील समर्थकांचे म्हणणे आहे की, भविष्यातील लढाईत सागर पाटील हेच रावसाहेब पाटील यांना सक्षम प्रतिस्पर्धी ठरतील. दरम्यान, हा ऑनलाईन सर्वेक्षण निकाल अधिकृत उमेदवारी व पक्षांतराच्या शक्यतांवर परिणाम करणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. आगामी दिवसात नगरदेवळा - बाळद गटात राजकीय घडामोडी अधिक वेगाने घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्वेक्षणातून स्थानिक नेतृत्व, युवा समर्थन आणि डिजिटल नेटवर्किंगचा प्रभाव स्पष्ट होत आहे. सोशल मीडिया आधारित या मतप्रवाहावर अंतिम उमेदवारी व मतदानाचे समीकरण किती बदलेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


Social Plugin