* ओतूर परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्या ; दुचाकीस्वार किरकोळ जखमी
जुन्नर / प्रतिनिधी :- जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे बिबट्याने अचानक रस्त्यावर येत दुचाकीला दिलेल्या धडकेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास राज लॉस परिसरात घडली. आपल्या कामावरून घरी परतत असलेल्या दुचाकीस्वाराच्या समोर अचानक बिबट्या आला आणि क्षणात त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक एवढी तीव्र होती की दुचाकीस्वार खाली पडला, मात्र, सुदैवाने तो किरकोळ जखमी होऊन थोडक्यात बचावला. या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी तत्काळ ही माहिती वन विभागाला दिली.
वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराचा सुरक्षा व परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ओतूर, जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि परिसरात बिबट्यांच्या हालचालींमध्ये वाढ झाली असून रात्रीच्या वेळी जनावरांवर तसेच पाळीव कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून, पुन्हा एकदा मानव - वन्यजीव संघर्ष आणि वन्यजीव संरक्षण या विषयावर चर्चेला उधाण आले आहे.


Post a Comment
0 Comments