Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ

* एका दिवसात तब्बल 15 नागरिक जखमी ?

* शासकीय रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नाही

* नागरिकांची भडगाव, पाचोरा, चाळीसगाव व जळगावकडे धाव - प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथे मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. कालच्या दिवसातच तब्बल 14 ते 15 नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनांमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सिकंदर खान जाफर खान यांच्या मुलाला बाजारातून घरी जात असताना जामा मशिदीच्या जवळ छोटू भाई यांच्या वेल्डिंग दुकानासमोर कुत्र्याने चावा घेतला. तसेच निसार बेग इब्राहिम बेग यांच्या मुलावरही कुत्र्याने हल्ला करीत गल्लीतच गंभीर जखमी केले. अनेकांनी याबाबत फोन करून 'दै. कोकण प्रदेश न्यूज'कडे व्यथा सांगितली.


सर्वात भयावह बाब म्हणजे नगरदेवळा येथील शासकीय रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना उपचारासाठी भडगाव, पाचोरा, चाळीसगाव अशा दूरच्या ठिकाणी जावे लागले. काहींना तर खासगी वाहनाने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यामुळे नागरिकांच्या जीवाला प्रचंड धोका निर्माण झाला आहे.


रात्रीच्या सुमारास काही तरुण व नागरिकांनी मिळून या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले, मात्र गावात अजूनही अनेक मोकाट कुत्रे, डुकरे आणि जनावरे वावरत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे सावट कायम आहे.


गावातील मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची ? हा प्रश्न आता नागरिकांतून मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व लोकप्रतिनिधी हे गावातील नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्यात अपयशी ठरत असल्याची तीव्र नाराजी जनतेतून व्यक्त होत आहे.


काही नागरिकांनी तर संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, आजही प्रशासनाचे वर्तन इंग्रजांच्या काळातील सत्ताधाऱ्यांसारखे आहे - जनतेला गुलाम समजून दुर्लक्ष केले जात आहे.


या घटनेने नगरदेवळा गाव प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तातडीने लसींचा पुरवठा व मोकाट प्राण्यांवर नियंत्रणाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement