* लोकसंख्या वाढ, शहरी सुविधांची गरज व विकासाची आवश्यकता - नागरिकांमध्ये नगर पंचायत स्थापनेची उत्सुकता
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावाला नगर पंचायतीचा दर्जा मिळण्याची प्रक्रिया वेगाने पुढे जात असून गावाचा विकास शहरी पातळीवर व्हावा, नागरिकांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी नागरिकांतून सातत्याने मागणी जोर धरत आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासन 2026 मध्ये प्रजासत्ताक दिनी काही नवीन नगर परिषद, नगर पंचायत व नगर पालिका रचना जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यात नगरदेवळ्याचे नावही मजबूत दावेदार म्हणून पुढे येत आहे. राज्य शासन स्तरावर नवे जिल्हे व तालुके निर्माणाबाबत देखील फाईल्स हालचालीत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे नगरदेवळा नगर पंचायत प्रस्तावकांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नगरदेवळा गावाची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 14,229 होती. मात्र, मागील 15 वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढून शहरी स्वरूप प्राप्त झाले असल्याचे स्थानिक प्रशासन स्रोतांनी सांगितले. गावात व्यवसाय, बाजारपेठ, शिक्षण संस्था, रस्ते, वाहतूक व निवासी बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढल्याने नगर पंचायत निर्माण करण्याचे निकष गाव पूर्ण करीत असल्याची माहिती संबंधित विभागांनी दिली आहे.
* नगर पंचायत का आवश्यक ? :- नगरदेवळा गावात सध्या रस्ते, नाली, पाणीपुरवठा सुविधांची मोठी गरज आहे...कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता असून स्ट्रीटलाईट्स व ड्रेनेज प्रणाली सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाजारपेठेचा विस्तार, शहरी दर्जाच्या सेवांची मागणी यास्तव शहरी विकासाच्या निधीचा लाभ मिळवण्यासाठी नगर पंचायत स्थापन होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
* नगर पंचायत झाल्यानंतर मिळणारे फायदे :- नगरदेवळा नगर पंचायत झाल्यास शासकीय निधी मोठ्या प्रमाणात मिळेल...रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणे व्यवस्थापनात सुधारणा...कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी...स्ट्रीटलाईट्स, उद्याने, सौंदर्यीकरण प्रकल्प... ऑनलाईन सेवा - जन्म / मृत्यू दाखले, व्यापार परवाने, स्थानिकांना रोजगाराच्या संधी, शहरी नियोजन (Town Planning) लागू, गावाचा दर्जा वाढून विकास नियोजनबद्ध होणार आहे.
* प्रक्रियेतील टप्पे पूर्ण - पुढील निर्णयाची प्रतीक्षा :- नगरदेवळा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ फेब्रुवारी 2026 मध्ये संपणार आहे. त्यामुळे पुढील निवडणूक नगर पंचायत स्वरूपात होण्याची शक्यता स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे. लोकसंख्या अहवाल सादर, शहरी विकास निकष पूर्ण, प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घोषित होऊ शकतो, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे.
* नागरिकांत उत्सुकता :- ग्रामपंचायत निवडणुका व जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुका जवळ येत असताना गावात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. नगर पंचायत जाहीर झाल्यास जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात बदल होणार का ? नवीन नगरसेवक व प्रशासनिक रचना कशी असणार ? याबाबत उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे.
* नगरदेवळा शहरीकरणाच्या दिशेने :- नगरदेवळा हा अग्नावंती नदीकाठचा ऐतिहासिक व निसर्गरम्य परिसर असून व्यवसाय, शिक्षण व उद्योगामुळे सातत्याने प्रगती करीत आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना व व्यापारी वर्ग यांनी नगर पंचायतीची गरज अधोरेखित केली असून गावाचा “गाव ते शहर” असा प्रवास निर्णायक टप्प्यावर असल्याचे चित्र आहे. शहरी दर्जा मिळाल्यास नगरदेवळा तालुक्यातील आदर्श शहरी गाव बनू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments