परळी वैजनाथ / प्रतिनिधी :- परळी वैजनाथ नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी आय्युब खाँन पठाण यांना दैनिक ‘द सोमेश्वर साथी’ तर्फे ‘समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक शैक्षणिक आणि जनसेवेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन संपादक बाळासाहेब फड यांनी त्यांच्या नावाची निवड केली असल्याचे अधिकृत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. दैनिक द सोमेश्वर साथीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.
आय्युब खाँन पठाण हे परळी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष पद भूषवले आहे. त्यांनी एकवेळा उपनगराध्यक्ष पद भूषवले असून पाणीपुरवठा सभापती म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कार्यकाळात नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, रस्ते, नाली, स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांकडे विशेष लक्ष दिले. सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन, महिला बचतगटांना मदत, तसेच वंचित घटकांना आधार देण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. समाजातील सर्व घटकांमध्ये वावरणारे आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी सदैव तत्पर असलेले जनसेवक, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तसेच त्यानी आ. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरानो काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी नागरिकासाठी तत्पर आहेत.
कोरोना काळात शिबीर असेल लसीकरण, पेशंटसाठी स्वतःचे वाहन देखील दिले. कोरोनो काळात 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होते. गेल्या अनेक वर्षांपासून परळी व बीड जिल्ह्यात सामाजिक कार्याची अखंड परंपरा जोपासली आहे. नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून कार्य करताना नागरिकांच्या पाण्याच्या, रस्त्यांच्या आणि स्वच्छतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली. तसेच धनंजय मुंडे यांच्यासोबत परळी मतदारसंघात विविध विकास कामे राबविताना त्यांनी जनतेशी घट्ट संबंध निर्माण केले. त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका, लोकांशी आत्मीयतेने वागण्याची वृत्ती आणि सामाजिक प्रश्नांबाबत सक्रिय सहभाग या गुणांमुळे ते परळी परिसरात आदराने पाहिले जातात. या सर्व कार्याची दखल घेऊन दैनिक द सोमेश्वर साथीचे संपादक बाळासाहेब फड यांनी एका अधिकृत पत्राद्वारे आय्युब खाँन पठाण यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती दिली आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड उपस्थित होते.
फड यांनी सांगितले की, आय्युब खाँन पठाण यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी असून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचले आहे. पुरस्कार सोहळा लवकरच परळी येथे उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते आयोजित करण्यात आलेल्या कार्यकमत होणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून आय्युब खाँन पठाण यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव होणार असून, हा सन्मान परळी शहरासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना आय्युब खाँन पठाण म्हणाले, हा पुरस्कार माझा नाही, तर परळीच्या जनतेचा व प्रभाग 2 मधील सर्वां नागरिकांचा आहे. त्यांच्या विश्वासाने आणि प्रेमानेच मला समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. हा गौरव माझ्या जबाबदाऱ्यांना आणखी बळ देणारा आहे. तसेच सर्वाच्या पाठिंब्यामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळते. हा पुरस्कार माझ्या कार्यात नवचैतन्य निर्माण करणारा आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर परळी शहरासह तालुक्यातील नागरिक, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा ओघ सुरू असून अनेकांनी “परळीचा खरा समाजरत्न” अशा शब्दांत त्यांचा गौरव केला आहे.


Post a Comment
0 Comments