* कव्वाली, संदल मिरवणूक आणि चादर अर्पणाने रेवदंडा झाला भक्तिरसाने ओतप्रोत
अलिबाग / ओमकार नागावकर :- रेवदंड्यातील प्रसिद्ध हजरत पीर शेहेनशा वली उरूस उत्सव बुधवार (दि. 5 नोव्हेंबर) रोजी भक्ती, आनंद आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. तब्बल 150 वर्षांची अखंड परंपरा असलेला हा धार्मिक सोहळा आजही श्रद्धा आणि सौहार्दाचा दीप प्रज्वलित ठेवत आहे. याप्रसंगी रेवदंडा शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्ग्यात चादर अर्पण केली आणि एकता, बंधुत्व व प्रेमाचा संदेश दिला.
* उत्सवाचे उत्कृष्ट आयोजन :- उत्सवाचे अध्यक्ष आसिफ गोंडेकर आणि त्यांचा मित्रमंडळ यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रमाचे आयोजन केले. दुपारपासूनच दर्गा परिसरात भक्तांची गर्दी वाढू लागली होती. संध्याकाळी पारंपरिक संदल मिरवणूक आणि चादर चढविण्याचा सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला. चादर अर्पणावेळी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिकांनी सहभागी होत धर्मसौहार्दाचा सुंदर नमुना साकारला.
* कव्वालीची सुरेल मैफल :- उत्सवानंतर रंगलेल्या कव्वालीच्या मैफलीने वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. प्रसिद्ध कव्वालांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत या भक्तिमय सुरावटींचा आनंद घेतला. मैफलीत श्रद्धा, संगीत आणि संस्कृतीचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनात इक्बाल फटाकरे, सलीम गोंडेकर, हानिफ गोंडेकर, मुजफ्फर मुकादम, सलीम तांडेल, सुहास घोणे, राहुल गणपत, सुजय घरत, दीपक वैद्य, प्रथमेश कोळसेकर, सचिन पवार यांचा मोलाचा सहभाग होता.
या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी जि. प. सदस्य वामन चुनेकर, चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, शाखाप्रमुख राजेंद्र गुरव, सदस्य राजेंद्र वाडकर, संदिप खोत, निलेश खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने सांगितले की, हा उरूस उत्सव रेवदंड्याच्या सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. धर्म आणि समाज जोडणाऱ्या या परंपरा टिकवणे हे आपले कर्तव्य आहे.
* सौहार्दाचा सुंदर संगम :- उरूस उत्सवाच्या निमित्ताने रेवदंडा गावाने पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेचा आणि समाजबंधुतेचा संदेश उजळून दाखविला. भक्ती, श्रद्धा आणि ऐक्याचा संगम घडविणारा हा उत्सव रेवदंड्याच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि सौहार्दाचा अभिमानास्पद सोहळा ठरला.


Post a Comment
0 Comments