Type Here to Get Search Results !

नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मनसेची एन्ट्री!

* अभिषेक बोरसे पंचायत समितीसाठी इच्छुक 

* मनसे - उद्धव सेनेच्या संभाव्य युतीची चर्चा जोरात

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आता नवीन समीकरणे दिसू लागली आहेत. भाजप, शिंदे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांसोबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) देखील मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे.


पाचोरा तालुक्यातील मनसेचे तालुका सचिव अभिषेक बोरसे यांनी पंचायत समितीसाठी अधिकृतरित्या इच्छुक असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणाला नवीन कलाटणी मिळाली आहे.


* गावाचा कायापालट करण्यासाठी लढणार :- इच्छुक उमेदवार अभिषेक बोरसे म्हणाले की, राज ठाकरे साहेबांचे विचार आणि भूमिका घराघरात पोहोचवण्यासाठी मी निवडणूक इच्छूक आहे. संधी मिळाल्यास गावाचा सर्वांगीण विकास करून दाखवेन. पंचायत समितीमध्ये प्रभावी नेतृत्व देऊन गावाच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


* युती होणार का ? चर्चांना ऊत :- राज्यात मनसे - उद्धव शिवसेना युती होण्याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीचा आधार लाभण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर युती झाली तर एक जागा मनसे, एक जागा उद्धव शिवसेना अशी समीकरणे नगरदेवळा परिसरात दिसू शकतात, अशी चर्चा आहे.


सूत्रांनुसार पंचायत समितीसाठी जिब्राईल शेख यांचे नाव उद्धव सेनेकडून जवळपास निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत मनसे व अभिषेक बोरसे कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.


* स्वबळ की युती ? अपक्ष पर्याय खुला :- मनसे आणि उद्धव सेना नगरदेवळ्यात स्वबळावर लढणार की युती करणार ? हा प्रश्न सध्या ताजा आहे. तिकीट न मिळाल्यास अभिषेक बोरसे अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता चर्चेत आहे.


* युवा नेतृत्वाची व्यूहरचना :- अभिषेक बोरसे हे मध्यवयीन, स्थानिक, गावाच्या विकासाचे स्वप्न बाळगणारे, उत्साही व सामाजिक कार्यात सक्रिय तरुण म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून ते सक्रियपणे जनसंपर्क मोहिमेत दिसत असून मतदारसंघात त्यांची चर्चा सुरू आहे.


नगरदेवळ्यातील निवडणूक रंगतदार होणार असून मनसेची एन्ट्री, मनसे - उध्दव सेना संभाव्य युती, युवा नेतृत्वाचा पुढाकार यामुळे स्थानिक राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. अभिषेक बोरसे निवडणूक अधिकृतपणे लढणार का ? मनसे स्वबळावर उतरणार की युती करणार ? हे काही दिवसांत स्पष्ट होईल.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement