* सिडकोकडून जागा महानगरपालिकेला तातडीने सुपूर्त करण्याची मागणी
* उपोषणकर्त्यांना ओपन एज्युकेशन परिवारासह सर्व सामाजिक संघटनांचे पाठबळ
नवी मुंबई / फिरोज पिंजारी :- आसूडगाव (पनवेल) झोपडपट्टी पुनर्वसन संघर्ष समितीने आपले न्यायहक्क आणि पुनर्वसनाची मागणी मान्य व्हावी म्हणून आजपासून सिडको भवन, बेलापूर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाचे मार्गदर्शन अनिता कोलते (उपोषणकर्त्या) यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसन संघर्ष समितीचे सर्व सदस्य, तसेच ओपन एज्युकेशनचा परिवार आणि अनेक सामाजिक संघटना या उपोषणात सहभागी झाल्या आहेत.
आसूडगाव (पनवेल) परिसरातील झोपडपट्टीधारक गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोली-उडुपगुळ्याजवळ असुरक्षित परिस्थितीत राहत आहेत. काही महिन्यांपूर्वी या भागात लागलेल्या भीषण आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. परिणामी अनेक कुटुंब बेघर झाले असून, सध्या ते अत्यंत हालअपेष्टांमध्ये जीवन जगत आहेत. या परिस्थितीत पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि सिडकोकडून महानगरपालिकेला जागा सुपूर्त करून झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करावे, अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे.
* समितीच्या प्रमुख मागण्या :- 2700 झोपडपट्टीधारकांना तातडीने शासनमान्य जागा किंवा घर उपलब्ध करून द्यावे. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसनातील पात्र कुटुंबांना आसूडगाव, पनवेल येथील भूखंड क्र. 33, 53 व 61 मधील जागा उपलब्ध करून द्यावी. आसूडगाव झोपडपट्टी परिसरातील 100 कुटुंबाना तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात यावे.
या उपोषणात अनिता कोलते यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. सर्वांनी सिडकोकडे मागणी केली आहे की, सामाजिक न्याय आणि पुनर्वसनाचा हक्क नाकारू नये आणि जनतेच्या भावनांचा आदर करून त्वरित निर्णय घ्यावा. उपोषणकर्त्यांनी नवी मुंबईतील सर्व सामाजिक संघटना, पत्रकार, आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, या लढ्यात आमच्या सोबत उभे राहा. आमचा संघर्ष केवळ आसूडगावसाठी नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या घराच्या अधिकारासाठी आहे.
सिडको भवन, बेलापूर येथे सुरू असलेले हे उपोषण न्यायहक्क आणि पुनर्वसनाच्या मागणीचे प्रतीक बनले आहे. सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन बेघर झालेल्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी सर्व स्तरांवरून मागणी होत आहे.


Post a Comment
0 Comments