* प्रभाग 3 मधील उमेदवार संजय म्हात्रे व सुजाता डाकी यांना पाटील यांचे विजयी भव अशा शुभाशिर्वाद
पेण / दिनकर भुजबळ :- पेण शहरातील राजकीय वातावरण तापत असतांना माजी आमदार भाई जयंत पाटील यांच्या भेटीने शहरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार संजय म्हात्रे व सुजाता डाकी यांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद दिला तसेच आगामी निवडणुकीत विजयी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
* गुरुनाथ मांजरेकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा निर्धार व्यक्त :- ही सदिच्छा भेट माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी माजी आमदार पाटील यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकीची रणनीती, प्रभागातील समस्या आणि मतदारांचा कल याबाबत सखोल चर्चा केली. संजय म्हात्रे आणि सुजाता डाकी यांनी पुष्पगुच्छ देऊन भाई जयंत पाटील यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
* आपल्या प्रेरणेमुळे आमच्यात नवसंजीवनी :- या वेळी बोलताना उमेदवार संजय म्हात्रे म्हणाले की, भाई आपण पेणमध्ये आलात, ही आमच्यासाठी अत्यंत मोठी प्रेरणा आहे. आपल्या उपस्थितीमुळे आमच्यात नवसंजीवनी निर्माण झाली असून निवडणुकीत अधिक उत्साहाने काम करण्याचे बळ मिळाले आहे.
* जनतेच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू व्हा :- माजी आमदार जयंत पाटील यांनी दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देताना जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे, प्रभागाचा प्रामाणिक विकास करण्याचे आणि विश्वासार्ह नेतृत्व ठेवण्याचे मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, पेणच्या जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत. त्यांच्यासाठी विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि ठोस काम करणारे नेतृत्व व्हा.
या भेटीस गुरुनाथ मांजरेकर, संजय म्हात्रे, सुजाता डाकी, प्रकाश शिंगरूत, रवी जाधव, सचिन भोसले, गणेश पवार, निलेश गुजर आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
* निवडणूक पार्श्वभूमीवर पेणमध्ये नवचैतन्य :- माजी आमदारांच्या या दौर्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी उमेद आणि उत्साहाची लाट निर्माण झाली असून प्रभाग 3 मधील निवडणूक समीकरणांवर या भेटीचा सकारात्मक परिणाम होईल, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. पेणच्या राजकीय धाग्यात नवीन जोश ओतणारी ही भेट आगामी निवडणुकीतील महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिली जात आहे.


Social Plugin